उत्तर प्रदेशात पहिल्या टप्प्यासाठी मतदान

मायावतींच्या नेतृत्वाखालील सरकार आज उत्तर प्रदेशातील पहिल्या टप्प्याच्या निवडणुकांमध्ये मतदारांना सामोरं जात आहे. उत्तर प्रदेशच्या विधान सभेच्या ५५ जागांसाठी एक कोटी ७१ लाख मतदार आपला कौल देतील.

Updated: Feb 8, 2012, 01:51 PM IST

www.24taas.com, लखनऊ

 

मायावतींच्या नेतृत्वाखालील सरकार आज उत्तर प्रदेशातील पहिल्या टप्प्याच्या निवडणुकांमध्ये मतदारांना सामोरं जात आहे. उत्तर प्रदेशच्या विधान सभेच्या ५५ जागांसाठी एक कोटी ७१ लाख मतदार आपला कौल देतील.

बाराबंकी, सितापूर, फैझाबाद, आंबेडकर नगर, बहारईच, श्रावस्ती, बलरामपूर, गोंडा, सिद्धार्थनगर, बस्ती या जिल्ह्यातील मतदारसंघामध्ये मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यातील ५५ विधानसभेच्या जागांसाठी ६५ महिला उमेदवारांसह ८६२ उमेदवार रिंगणात आहेत. या उमेदवारांमध्ये दोन मंत्री, ३१ आमदार आणि १५ माजी मंत्रीही आपले नशीब आजमावत आहेत. एकूण मतदारांपैकी महिला मतदारांची संख्या ७८.२४ लाख इतकी आहे.

 

निवडणूक आयोगाने १८,८१० मतदान केंद्रांची व्यवस्था दहा जिल्ह्यांमध्ये केली आहे. तसंच ७२,००० निवडणूक कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. बसपा आणि भाजपचे उमेदवार सर्व मतदारसंघात तर काँग्रेसचे उमेदवार ५४ मतदारसंघात रिंगणात आहेत. निवडणूक आयोगाने दोन लाख पोलिस आणि निमलष्करी दलाच्या ६८० कंपन्या चोख बंदोबस्तासाठी तैनात केल्या आहेत.

 

नेपाळ लगतच्या जिल्ह्यांमध्ये मतदारसंघात निवडणुका होत असल्याने सीमा बंद करण्यात आल्या आहेत. निवडणुका होत असलेल्या ५५ जागांपैकी बसपाच्या ताब्यात ३०, समाजवादी पक्षाच्या १८, भाजपच्या चार आणि काँग्रेसच्या ताब्यात तीन मतदारसंघ आहेत.