www.24taas.com, नवी दिल्ली
गेल्या तीन दशकांहून अधिक काळ आपल्या मादक हास्यानं, अभिनयानं आणि अदांनी प्रेक्षकांना घायाळ करणाऱ्या रेखाला लवकरच आयफा पुरस्कारानं सन्मानित केलं जाणार आहे.
भारतीय सिनेमा क्षेत्रातल्या योगदानासाठी अभिनेत्री आणि खासदार रेखाला आयफा पुरस्कार सोहळा २०१२मध्ये सन्मानित करण्यात येणार आहे. १९७०मध्ये सावन भादों या चित्रपटासोबत रेखानं अभिनय क्षेत्रात आपलं पाऊल टाकलं. त्यानंतर आलेल्या दो अनजाने, उमराव जान आणि सिलसिलासारख्या चित्रपटांच्या माध्यमातून रेखानं काही काळातच हिंदी चित्रपट क्षेत्रात आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला. तिच्या एका लकबीनं प्रेक्षक घायाळ होऊन जात आणि रेखाची हिच जादू आजही कायम आहे. आयफा पुरस्कार सोहळ्यात दरवर्षी सिनेमा क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या एका व्यक्तिचा पुरस्कार देऊन सन्मान केला जातो. यावर्षीचा हा बहुमान रेखाला प्राप्त होणार आहे.
‘या पुरस्कारासाठी माझी निवड होणं, हा माझ्यासाठी बहुमान आहे. खूप मोठा प्रवास झालाय पण, सिनेमासाठी माझी आस्था प्रेक्षकांपर्यंत जरूर पोहचत राहील, अशी मला आशा आहे. सिनेमा क्षेत्र आपली १०० वर्ष पूर्ण करत आहे आणि याचवर्षी मलादेखील हा पुरस्कार मिळतोय, ही माझ्यासाठी निश्चितच आनंदाची बाब आहे’ अशी प्रतिक्रिया रेखानं व्यक्त केलीय. यंदा सिंगापूरमध्ये ७ जून ते ९ जूनपर्यंत आयफा सोहळा आयोजित केला जातोय.
.