Worli Hit and Run Case: वरळी हिट अँड रन प्रकरणी अटकेत असलेला शिवसेनेचा उपनेता राजेश शाहला (Rajesh Shah) शिवडी कोर्टाने (Sewri Court) जामीन मंजूर केला आहे. कोर्टाने राजेश शाह (Rajesh Shah) यांची अटक बेकायदेशीर ठरवली आहे. कोर्टाने 15 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. दरम्यान चालक राजऋषी बिडावत याला एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे
मुंबईतील वरळीत बीएमडब्ल्यूने (BMW) दिलेल्या धडकेत एका महिलेचा मृत्यू झाला असून, पती जखमी झाला आहे. मद्यप्राशन करुन बेदरकारपणे बीएमडब्ल्यू चालवणारा राजेश शाहचा मुलगा मिहीर शाह सध्या फऱार आहे. पोलिसांनी शिवसेना उपनेते असणारे त्याचे वडील आणि चालकाला अटक केली होती.
मुंबईत राहणारे प्रदीप नाखवा (Pradeep Nakhava) आणि त्यांच्या पत्नी कावेरी नाखवा (Kaveri Nakhava) वरळीच्या कोळीवाड्यात (Worli Koliwada) राहतात. त्यांचा मासे विकण्याचा व्यवसाय असून त्यावरच ते पोट भरतात. ससून डॉक येथून मासे खरेदी करुन ते परतत असताना बीएमडब्ल्यूने (BMW) त्यांच्या स्कूटरला धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की दोघे हवेत फेकले गेले. कावेरी यांना कारने फरफटत नेलं. त्यांना रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी मृत घोषित केलं.
अपघातात जखमी झालेले प्रदीप नाखवा सकाळपासूनच पोलीस ठाण्यात थांबले होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांना तो क्षण आठवून रडू येत होतं. त्यांनी सांगितलं की, "अपघात सकाळी 5.30 वाजता झाला. कार मागून आली आणि स्कूटरला धडकली. आमची गाडी एका कोपऱ्यातून 30-35 च्या स्पीडने चालली होती. धडक दिल्यानंतर आम्हाला काही वेळ काय झालं ते समजलंच नाही. आम्ही बोनेटवर पडलो. मी त्याला थांब म्हटल्यावर त्याने ब्रेक मारला असता आम्ही दोघे खाली पडलो. मी डाव्या बाजूला पडलो. मी तिला खेचणार तितक्यात त्याने तिच्या अंगावर गाडी घातली आणि फरफटत नेली. सीजी हाऊस ते सी-लिंक किती लांब आहे, काय तिची अवस्था झाली असेल सांगा".
"मला दोन मुलं आहेत, आता मी काय करणार? हे मोठे लोक आहेत, कोणी काही करणार नाही. आम्हालाच त्रास होईल", अशी हतबलताही त्यांनी बोलून दाखवली.
पोलिसांच्या माहितीनुसार, ही कार मिहिर शाहच्या नावावर नोंदणीकृत आहे. अपघाताच्या वेळी मिहीर शाह आणि त्याचा चालक कारमध्ये होता. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मिहीर शाहने शनिवारी रात्री जुहू येथील एका बारमध्ये मद्यपान केलं. घरी जाताना त्याने ड्रायव्हरला लाँग ड्राईव्हला घेऊन जाण्यास सांगितलं. गाडी वरळीला आली आणि मग मिहीरने गाडी चालवण्याचा हट्ट धरला. त्याने स्टेअरिंग हातात घेतल्यानंतर काही वेळातच भरधाव वेगाने जाणाऱ्या बीएमडब्ल्यूने नाखवा दांपत्याच्या स्कूटरला धडक दिली.
पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे, ज्यामध्ये हत्या, बेदरकारपणे वाहन चालवणं आणि पुरावे नष्ट करणे यांचा समावेश आहे. मोटार वाहन कायद्यातील तरतुदीही लागू करण्यात आल्या आहेत. तसंच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे उपनेते राजेश शाह आणि चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतंल आहे. त्यांची चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान मिहीर शाह फरार असून पोलिसांची चार पथके त्याचा शोध घेत आहेत.