मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपले संकल्प पत्र प्रकाशित केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याची घोषणा केली. गेल्या पाच वर्षांत जे काम झाले. त्याचा अनुभव आणि भविष्यातील दिशा लक्षात घेवून हे संकल्पपत्र तयार केले आहे. शेतकऱ्यांकरिता दुष्काळ मुक्ती, रोजगार निर्मिती, पायाभूत सुविधांवर भर देण्यात येणार आहे. कोकणातील १६७ टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात आणण्याचा प्रयत्न आहे. पूर्व विदर्भातील पाणी पश्चिम विदर्भात आणणे, पुरातून वाहून जाणारे पाणी पश्मिम महाराष्ट्राच्या दुष्काळी भागात नेण्याचा प्रयत्न केला जाईल. यातूनच दुष्काळमुक्त महाराष्ट्र करायचा आहे, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
संकल्प पत्रात नदीजोड प्रकल्प मार्गी लावणार असल्याचे म्हटले आहे. तसेच मराठवाड्याला हक्काचे पाणी मिळवून देणार असून राज्याचीच अर्थव्यवस्था आकड्यात नाहीतर ट्रिलियन डॉलरवर नेण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे. शेती, उद्योग आणि सेवा क्षेत्रातील रोजगार यामुळे वाढेल असा दावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला.
दरम्यान, राज्याचे प्रभारी जे. पी. नड्डा म्हणालेत, देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय संस्कृती बदलली आहे. राज्याचा चेहरामोहरा बदलण्याचे काम केले आहे. भ्रष्टाचारग्रस्त हे राज्य होते, मुख्यमंत्री पदाची खुर्ची ही संगीत खुर्ची झाली होती, हे सर्व बदलले आहे. पारदर्शकता, स्थैर्य फडणवीस यांनी दिले आहे.
भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणालेत, राज्यातील प्रत्येक क्षेत्राचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या पाच वर्षांत कुठलाही मोठा संघर्ष, जातीय दंगल झाली नाही. महापूर भागातील पाणी पाईपलाईनने दुष्काळ भागात नेले तर मोठा प्रश्न सुटेल. शिवरायांचे स्मारक, बाबासाहेबांचे स्मारक आम्ही पूर्ण करणार आहोत. आगामी काळात सूख, आनंद व समृद्धता यावर लक्ष असेल.