गोरेगाव-चर्चगेट 9.53ची फास्ट लोकल रद्द होणार? पश्चिम रेल्वेने दिलं स्पष्ट उत्तर

Mumbai Local Train Update: गोरेगाव येथून सुटणारी 9.53 ची चर्चगेट लोकल रद्द होणार असल्याच्या चर्चा असतानाच रेल्वेने स्पष्टीकरण दिलं आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Apr 25, 2024, 04:19 PM IST
गोरेगाव-चर्चगेट 9.53ची फास्ट लोकल रद्द होणार? पश्चिम रेल्वेने दिलं स्पष्ट उत्तर  title=
Western railway will not Cancel 9:53 Am Goregaon-Churchgate Fast Local

Mumbai Local Train Latest News: मुंबई लोकल म्हणजे मुंबईकरांचा श्वास आहे. एकदिवस जरी लोकलची वाहतुक विस्कळीत झाली तर घरी पोहोचण्यासाठी अनेक अडचणी मुंबईकरांना पार कराव्या लागतात. लोकलची गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. पश्चिम रेल्वेवर (Western Railway) प्रवाशांची गर्दी दिवसेंदिवस वाढतच आहेत. त्यामुळं उपनगरीय गाड्यांची संख्या वाढवण्यात यावी, अशी प्रवाशांची मागणी आहे. मात्र, पश्चिम रेल्वे प्रशासनाने गोरेगाव येथून चर्चगेटसाठी सुटणारी फास्ट लोकल रद्द करणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. त्यावर आता रेल्वे प्रशासनाने उत्तर दिलं आहे, 

पश्चिम रेल्वे मार्गावरील सकाळी गर्दीच्या वेळेत सुटणारी 9.53 लोकल रद्द करण्याच्या हालचाली सुरू केल्याचं बोललं जात होतं. बोरिवली-चर्चगेट जलद एसी (Borivali Churchgate AC Local) लोकल सकाळी 9.53 वाजता सुटते त्यामुळं सकाळची 9.53ची चर्चगेट फास्ट लोकल रद्द करण्यात येणार अशी चर्चा होती. तसंच, एसी लोकलमुळं सामान्य लोकल गाड्या उशिराने धावतात त्यावर उपाय म्हणूनही रेल्वेने हा तोडगा काढला होता. 

सकाळी चर्चगेट व दक्षिण मुंबईत जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या जास्त आहे. अशावेळी विरार, बोरीवली, चर्चगेट लोकलना खूप जास्त गर्दी असते. अशावेळी अंधेरी व गोरेगावरहून सुटणाऱ्या ट्रेनमध्ये चढायला मिळत नाही. त्यामुळं गेल्या काही वर्षांत गोरेगाव-जोगेश्वरीच्या प्रवाशांसाठी गोरेगाव लोकल सुरू करण्यात आल्या आहेत. सकाळी गर्दीच्या काळात या लोकल सुटतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या लोकल विलंबाने धावतात. खार रोड स्थानकात लोकल कित्येक वेळ थांबून राहते. त्यामुळं त्याचा वेळेवरही परिणाम होत आहे. 

अशातच रेल्वे प्रशासनाने गोरेगाव-चर्चगेट लोकल रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत प्रवाशांनी संताप व्यक्त केला होता. मात्र, आता रेल्वे प्रशासनाने यावर स्पष्टीकरण दिले आहे. सकाळी 9.53 ची गोरेगाव-चर्चगेट कायमस्वरुपी बंद होणार नाहीये. टीआरटी मशीनद्वारे स्लीपर नुतनीकरणासाठी अंधेरी-विलेपार्ले दरम्यान अप मार्गावर सध्या वेग मर्यादा आहे. त्यामुळं या मार्गावर लोकल उशिराने धावत आहेत. वेगावरील निर्बंध शिथिल झाल्यानंतर लोकल सेवा पुन्हा सुरू होणार आहेत. त्याचबरोबर रोज सकाळी 9.53 ची गोरेगाव-चर्चगेट लोकल रद्द होणार नाहीये, असं देखील प्रशासनाने सांगितले आहे. 

लोकलसाठी प्रवाशांनी स्वाक्षरी मोहिम

गोरेगाव येथून प्रवास करणाऱ्या लोकांची संख्या खूप आहे. त्यामुळं ही लोकल रद्द होऊ नये यासाठी प्रवाशांनी पुढाकार घेत 9.53च्या लोकलमध्ये स्वाक्षरी मोहिम राबवली होती.