मुंबईतील लोकल ट्रेन बंद असल्याने पश्चिम रेल्वेला २९१ कोटींचा तोटा

देशात अचानक लॉकडाऊन जाहीर झाल्याने पश्चिम रेल्वेला मोठ्याप्रमाणावर लोकांच्या तिकिटांचे पैसे परत करावे लागले. 

Updated: Aug 2, 2020, 12:17 PM IST
मुंबईतील लोकल ट्रेन बंद असल्याने पश्चिम रेल्वेला २९१ कोटींचा तोटा title=

मुंबई: कोरोना संकटामुळे देशभरातील रेल्वेसेवा आणि लोकल ट्रेन बंद राहिल्याने पश्चिम रेल्वेला मोठा आर्थिक फटका बसल्याची माहिती समोर आली आहे. देशात लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून आतापर्यंतच्या कालावधीत पश्चिम रेल्वेचे जवळपास १९५९ कोटी रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे. यापैकी २९१ कोटींचे नुकसान हे मुंबईतील उपनगरीय रेल्वेसेवा बंद असल्यामुळे झाले. तर उर्वरित १६६८ कोटींचे नुकसान हे लांब पल्ल्याच्या आणि इतर सेवा बंद असल्यामुळे झाल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहे.

मुंबई | लोकलमध्ये फिजिकल डिस्टन्सिंगचे तीनतेरा

याशिवाय, देशात अचानक लॉकडाऊन जाहीर झाल्याने पश्चिम रेल्वेला मोठ्याप्रमाणावर लोकांच्या तिकिटांचे पैसे परत करावे लागले. या भुर्दंडाचा आकडाही मोठा आहे. १ मार्च ते ३१ जुलै या कालावधीत पश्चिम रेल्वेने तिकीट रद्द झालेल्या प्रवाशांना ४०७.८४ कोटी रुपये परत केले आहेत. यामध्ये एकट्या मुंबई विभागाचा वाटा १९५.६८ कोटी इतका असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले. 

शाब्बास मुंबईकरांनो.... जुलैमध्ये सर्वाधिक रुग्णांची कोरोनावर मात

पश्चिम आणि मध्य रेल्वेसेवा ही मुंबईची लाईफलाईन मानली जाते. मात्र, सध्या कोरोनाच्या संकटामुळे सामान्य प्रवाशांसाठी या दोन्ही रेल्वे सेवा बंद आहेत. केवळ सरकारी कर्मचारी आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना लोकल ट्रेनने प्रवास करण्याची मुभा आहे. मात्र, यामुळे मुंबईत कामासाठी येणाऱ्या अनेक चाकरमन्यांना मोठा फटका बसत आहे. त्यामुळे मुंबईतील ट्रेन्स लवकर सुरु कराव्यात, अशी मागणी सातत्याने जनतेकडून केली जात आहे. गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईतील कोरोनाची साथ बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आली आहे. त्यामुळे आतातरी केंद्र सरकार मुंबईतील लोकल ट्रेन सुरु करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.