मुंबई : श्रावण महिन्यात ढगांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. पुढचे 3 ते 4 दिवस राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. चौथ्या आणि पाचव्या दिवशी कोकणात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
पुढील 3 ते 4 दिवस राज्याच्या काही भागात मेघ गर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान विभागानं पावसाबाबतचा अंदाज वर्तवला आहे. राज्याचा काही भाग सोडला तर बहुतांश भागात पावसानं दडी मारली आहे. अशातच पावसाच्या पुनरागमनाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
अमरावती, भंडारदरा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात उद्या मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 4 आणि 5 ऑगस्ट रोजी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदाबाद, पुणे या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
3 आणि 4 ऑगस्ट रोजी पश्चिम महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसंच पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातही पावसाचा इशारा आहे.
गेल्या दोन दिवसापासून येवला शहरासह तालुक्यामध्ये पावसाने उघडीप दिली. त्यामुळे शेतीकामांना वेग आलाय. सतत पाऊस सुरू असल्यानं शेती कामं थांबली होती. पावसाने विश्रांती घेतल्यानं शेतकरी मोठ्या जोमाने कामाला लागलेत.. पिकांवर औषध फवारणी, कोळपणीचे कामे सध्या शेतात सुरु आहेत.
पुण्यातल्या शिरुर तालुक्यातील पिंपरखेड इथे ढगफुटी सदृश पावसामुळे शेतीचे नुकसान झालं आहे. याठिकाणी माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी पाहणी दौरा करत अधिका-यांना तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिलेत.