नवी दिल्ली : गेल्या काही वर्षांपासून रखडलेला मोनोचा दुसरा टप्पा उद्यापासून सुरू होणार आहे. उद्या संध्याकाळी सहा वाजता वडाळा डेपो इथं मोनोचा दुसरा टप्पा वडाळा ते सातरस्ताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण होईल. या दुसऱ्या टप्प्यात संत गाडगे महाराज चौक, लोअर परळ, मिंट कॉलनी, आंबेडकर नगर, नायगाव, दादर पूर्व, वडाळा पूल, आचार्य अत्रे नगर, अँटॉप हिल आणि जी. टी. बी. नगर ही मोनोची स्थानकं आहेत. मोनोरेल स्थानके आणि इतर सुविधा बांधल्यानंतर तब्बल दहा वर्षांनी दुसऱ्या टप्प्यातील मोनोरेलला सुरूवात होणार आहे. यापूर्वी चेंबूर ते वडाळा दरम्यान पहिल्या टप्प्यातील मोनोरेल २०१४मध्ये सुरू करण्यात आली आहे. दुसऱ्या टप्प्यातील मोनोरेलमुळे आता जवळपास एक लाख प्रवासी मोनोरेलने प्रवास करु शकणार आहेत. आता चेंबूर ते जेकब सर्कल दरम्यानचं तिकीट दहा ते ४० रुपयापर्यंत असणार आहे.
मोनोच्या पहिल्या टप्प्यातील चेंबूर ते वडाळा हे अंतर 8.26 कि.मी आहे. तर चेंबूर ते सात रस्ता हे अंतर 11.28 किं.मी इतके आहे. चेंबूर ते सातरस्ता प्रवास करण्यासाठी आतापर्यंत 90 मिनिटांचा वेळ लागायचा पण आता मोनोमुळे या रस्त्यातील अंतर 30 मिनिटांवर आले आहे. त्यामुळे मुंबईकरांना आता 19.54 कि.मी च्या मोनोमार्गावर प्रवास करता येणार आहे.
संपूर्ण मोनो मार्गावर सकाळी 6 वाजल्या पासून रात्री 10 वाजेपर्यंत प्रत्येक 22 मिनिटांनी मोनो सेवा उपलब्ध होणार आहे.
फेब्रुवारी २०१४ मध्ये मोनोचा चेंबूर ते वडाळा हा पहिला टप्पा सुरू झाला. या दोन स्थानकांच्या दरम्यानची स्थानके ही फारशी वर्दळीची नसल्याने मोनोला सुरुवातीपासूनच अपेक्षित प्रवासी संख्या मिळू शकली नाही. साहजिकच मोनोचा प्रवास हा तोट्यातच सुरू होता. मोनोला दरमहा किमान ८० लाख ते एक कोटींचा तोटा होत आहे. आजच्या घडीला रोज जेमतेम १५ हजार प्रवासी मोनोने प्रवास करतात. तर दिवसाला फक्त १८ ते २० हजार रुपयांचा महसूल तिकीट विक्रीतून मिळतो.