वनगा कुटुंबीयांच्या सेना प्रवेशानंतर सावरांना 'वर्षा'हून बोलावणं

वनगा कुटुंबीयांच्या निर्णयानं दु:ख झाल्याची प्रतिक्रिया सावरा यांनी व्यक्त केली.

Updated: May 3, 2018, 11:08 PM IST

मुंबई : पालघर पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना भाजपमध्ये घडामोडी घडताना दिसताय. दिवंगत भाजप खासदार चिंतामण वनगा यांच्या कुटुंबीयांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानं भाजपला धक्का बसलाय... इतकंच नाही तर 'असं काही होईल याची कल्पनाच नव्हती', अशी प्रतिक्रिया आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी 'झी २४ तास'शी बोलतना व्यक्त केलीय. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीनं विष्णू सावरा यांना तातडीनं आपल्या निवासस्थानी 'वर्षा'वर बोलावून घेतलंय. 

पोटनिवडणुकीत उमेदवार म्हणून वनगांसाच्याच मुलाचा विचार केला होता... वनगा कुटुंबीयांच्या निर्णयानं दु:ख झाल्याची प्रतिक्रिया सावरा यांनी व्यक्त केली. 'असं काही होईल याचा अंदाजच नव्हता... हे जे काही होत आहे त्यावर विश्वास बसत नाहीय', असं विष्णू सावरा यांनी 'झी २४ तास'शी बोलताना म्हटलं. तसंच

यासोबत, मी लोकसभेत जाण्यास उत्सुक नाही, असंही सावरा यांनी स्पष्ट केलंय. 

वनगा कुटुंबीय शिवसेनेत

दरम्यान, दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या कुटूंबियांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. भाजपाने दुर्लक्ष केल्याने त्यांनी आज मातोश्रीची वाट धरली. पालघर पोटनिवडणुकीत आता राजकीय रंग बदलले असल्याचं दिसून येत आहे. खासदार चिंतामण वनगा यांच्या मृत्यूनंतर पोटनिवडणुकी संदर्भात आपल्या कुटुंबीयांनी भाजपनं आपल्यावर 'मातोश्री' गाठण्याची वेळ आणल्याचं म्हटलंय. भाजप आणि चिंतामण वनगा यांचं नातं अतूट होतं. परंतु, आज त्यांच्या कुटुंबीयांनी अश्रुभरल्या डोळ्यांनी आपल्या पक्षानं आपल्याला वाऱ्यावर सोडल्याचं सांगितलंय. पालघर पोटनिवडणुकीत भाजपनं वनगा यांच्या कुटुंबीयांकडे दुर्लक्ष केल्याची खंत त्यांनी यावेळी बोलून दाखवली. आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची फोनवरून आणि एसएमएसवरून भेट मागितली पण त्यांनी काही वेळ दिली नाही, असंही त्यांनी यावेळी म्हटलंय.