Crime News : भांडणात बाजू घेतली नाही म्हणून मुलाने आईलाच संपवलं... विरारमधील धक्कादायक प्रकार

Crime News : आईच्या हत्येनंतर आरोपी मुलाने घराला टाळं लावून पळ काढला होता. विरारच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी मुलाचा माग काढत त्याला अटक केली आहे. शुल्लक कारणावरुन ही हत्या केल्याचे म्हटले जात आहे

Updated: Mar 10, 2023, 04:05 PM IST
Crime News : भांडणात बाजू घेतली नाही म्हणून मुलाने आईलाच संपवलं... विरारमधील धक्कादायक प्रकार title=

प्रथमेश तावडे, झी मीडिया, विरार : शुल्लक कारणावरुन मुलानेच जन्मदात्या आईची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार विरारमध्ये (Virar News) घडल्याचे समोर आले आहे. मुलाने गळा दाबून आईची हत्या (Crime News) केली आणि घराला कुलूप लावून पळ काढला. या प्रकरणी पोलिसांनी (Police) मुलाला अटक केली आहे. या प्रकारानंतर परिसरामध्ये खळबळ उडाली असून या घटनेबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

गुरुवारी विरारमध्ये राहत्या घरी आईचा गळा दाबून खून केल्याप्रकरणी 26 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. आरोपी देवांश धनू याने आईच्या हत्येनंतर फ्लॅटला कुलूप लावून पळ काढला. महिलेची आई तिला शोधत घरी आल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. मृत महिलेचे नाव वैशाली असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी मुलाला ताब्यात घेतले आहेय

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैशाली आणि देवांश वक्रतुंट अपार्टमेंट, फूलपाडा, विरार (पूर्व) येथे राहत होते. माहीम येथील एका नातेवाईकाच्या लग्नाला दोघांनी गेल्या आठवड्यात हजेरी लावली होती. बेरोजगार असलेल्या देवांशने या लग्नात दारु पिऊन गोंधळ घातला होता. हा सर्व प्रकार पाहून वैतागलेल्या नातेवाईकांनी पोलिसांना बोलवण्याची धमकी दिली होती. या सर्व प्रकारानंतर वैशाली मुलांवर संतापली होती. तिने देवांशवर आरडाओरडा केला.

मंगळवारी या सर्व प्रकारानंतर त्यांच्या घरात दोघांचेही जोरदार भांडण झाले. लग्नात आई आपल्या बाजूने उभी न राहिल्याचा राग देवांशच्या मनात होता. याच रागातून देवांशने ओढणीने वैशाली यांचा गळा दाबून खून केला. या भांडणाबद्दल वैशाली यांनी विरार येथे राहणाऱ्या त्यांच्या आईला या भांडणाबद्दल सर्व हकीकत सांगितली होती. वैशाली या त्यांच्या आईच्या फोनला उत्तर देत नसल्यामुळे गुरुवारी दुपारी त्यांनी देवांशसोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानेही प्रतिसाद दिला नाही.

कोणतीच माहिती मिळत नसल्याने वैशाली यांच्या आई या फ्लॅटवर पोहोचल्या. त्यावेळी दाराला कुलूप होते. त्यांनी दार उघडले असता वैशाली या बेडरूममध्ये पडलेल्या दिसल्या. त्यांनी तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. बेडवर वैशाली यांचा गळा दाबण्यासाठी वापरलेली ओढणी आढळून आली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने देवांशचा माग काढत त्याला अटक केली आहे.

दरम्यान, देवांशवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवांश दारूच्या नशेत होता का याचा शोध घेत असल्याचे पोलिसांनी सांगितले. गुरुवारी पहाटे हा सर्व प्रकार घडल्याचे म्हटले जात आहे.