विधानसभा अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीची रणनीती

रविवारी, विधानसभेत अध्यक्षपदाची निवडणूक आणि विरोधी पक्षनेत्याची नियुक्ती पार पडेल

Updated: Nov 30, 2019, 06:55 PM IST
विधानसभा अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीची रणनीती  title=
फाईल फोटो : नाना पटोले

मुंबई : महाराष्ट्रातल्या विधानसभेत आज नवनिर्वाचित उद्धव ठाकरे सरकार बहुमत चाचणीत यशस्वी ठरलंय. यासाठी विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून दिलीप वळसे पाटील यांनी कामकाज पाहीलं. यानंतर, आता पूर्णवेळ विधानसभा अध्यक्षपदी कुणाची निवड होणार? याकडे सगळ्याच पक्षांचं लक्ष लागलंय. विधानसभा अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीतर्फे नाना पटोले यांनी अर्ज भरला आहे तर विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून किसन कथोरे यांच्या नावाची घोषणा करण्यात आलीय. उल्लेखनीय म्हणजे, विधानसभा अध्यक्षपदासाठी गुप्त मतदान पद्धतीचा अवलंब केला जातो. मात्रा, गुप्त मतदानाने होणारी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक खुल्या पद्धतीने घेण्याची रणनीती महाराष्ट्र विकास आघाडीनं आखलीय. 

अध्यक्षपदाच्या निवडणुकीत गुप्त मतदान होते, ते टाळण्यासाठी सत्ताधारी पक्षाकडून गुप्त मतदानाऐवजी खुल्या पद्धतीने मतदानाचा प्रस्ताव विधानसभेत मांडला जाईल. हा प्रस्ताव अध्यक्ष विधानसभेत मंजुरीसाठी पुकारतील. त्यानंतर सत्ताधारी पक्षाकडे बहुमत असल्याने खुल्या पद्धतीने मतदान घेण्याचा प्रस्ताव मान्य करून अध्यक्षपदाची निवडणूक खुल्या पद्धतीने घेतली जाईल, अशी रणनीती महाविकास आघाडीनं आखलीय. 

उल्लेखनीय म्हणजे, रविवारी सकाळी १०.०० वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची वेळ देण्यात आलीय. भाजप उमेदवाराने अर्ज मागे घेतल्यास ही निवडणूक होणार नाही. परंतु, कथोरे यांनी आपला अर्ज मागे घेतला नाही तर ही निवडणूक पार पडेल... आणि निवडणूक झाली तर ती खुल्या पद्धतीने व्हावी, यासाठी महाविकास आघाडी प्रयत्नशील आहे.

रविवारी विधिमंडळात...

रविवारी, विधानसभा आणि विधान परिषदेचे कामकाज सुरू राहणार आहे. विधानसभेत अध्यक्षपदाची निवडणूक आणि विरोधी पक्षनेत्याची नियुक्ती पार पडेल. संयुक्त सभागृहात राज्यपालांचे अभिभाषणही होईल. तर विधान परिषदेमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या मंत्र्यांचा परिचय करून देतील आणि राज्यपालांच्या विवासनाची प्रत पटलावर ठेवली जाईल.

नानाभाऊ फाल्गुनराव पटोले यांचा परिचय

शिक्षण - पदवीधर

१९९२ - भंडारा जिल्हा परिषदेचे सदस्य

१९९४ - भंडारा जिल्हा बँकेचे संचालक

१९९९ महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य

२००४ महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य

२००९ महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य

२०१४ लोकसभा सदस्य

२०१९  महाराष्ट्र विधानसभा सदस्य

डिसेंबर २०१७ पासून भारतीय राष्ट्रीय किसान काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून कार्यरत