वरळीतून शिवसेनेचे तीन आमदार? सुभाष देसाई यांचं मंत्रीपद धोक्यात ?

शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वरळी मतदार संघातून तीन आमदार?

Updated: Jun 7, 2022, 02:48 PM IST
वरळीतून शिवसेनेचे तीन आमदार? सुभाष देसाई यांचं मंत्रीपद धोक्यात ?  title=

मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई : मुंबईतील वरळी (Worli) हा परिसर उच्चभ्रू याचबरोबर मराठी बहुल असाही आहे. वरळी हा शिवसेनेचा (ShivSena) बालेकिल्ला म्हणूनही ओळखले जातो. म्हणूनच शिवसेनेची भिस्त वरळीवर अधिक आहे. ठाकरे घराण्यात पहिली निवडणूक शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी लढवली. 

ठाकरे घराण्यातील पहिलीच व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणार उतरणार असल्याने शिवसेनेने वरळी हा सुरक्षित मतदारसंघ निवडला होता. कारण इथून आदित्य ठाकरे निवडुन येण्याची खात्री होती. यामुळेच आदित्य ठाकरे यांनी वरळी मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली आहे ते विजयीदेखील झाले. 

सचिन अहिर विधानपरिषदेवर ?
आता याच वरळी परिसरातून शिवसेनेचे तीन आमदार होण्याची शक्यता आहे. वरळी मतदारसंघातून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे विधानसभेवर निवडून गेले आहेत. तर आधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणि आता शिवसेनेत असलेले सचिन अहिर (Sachi Ahir) यांचाही या मतदारसंघात दबदबा आहे. ते 2009 ते 2014 याच मतदारसंघातून विधानसभेवर निवडून जात. 

मात्र 2019 च्या निवडणुकीच्या तोंडावर सचिन अहिर शिवसेनेते आले आणि आदित्य ठाकरेंसाठी वरळी मतदारसंघ सोडायलाही भाग पाडले. याचेच फळ आता सचिन अहिर यांना मिळण्याची शक्यता आहे. कारण विधानपरिषद उमेदवारीसाठी सचिन अहिर यांचं नाव शिवसेना जाहीर करण्याची शक्यता आहे. 

तर या परिसरात कार्यरत असलेले शिवसेनेचे सुनील शिंदे (Sunil Shinde) देखील सध्या विधानपरिषेवर आमदार आहेत. ते 2014 ते 2019 वरळी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार होते. यामुळे जर सचिन अहिर यांना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर झाली आणि ते निवडून आले तर वरळी परिसरातील शिवसेनेचे तब्बल तीन आमदार होतील.

सुभाष देसाई यांचे मंत्रीपद धोक्यात ? 
दरम्यान, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई (Subhash Desai) आणि दिवाकर रावते (Diwakar Raote) यांना यावेळी विधानपरिषदेसाठी शिवसेना उमेदवारी देण्याची शक्यता कमी आहे. जर सुभाष देसाई यांना विधानपरिषदेवर पाठवलं नाही तर त्यांचे मंत्रिपदही धोक्यात येऊ शकते. कारण मंत्री पदावर असणाऱ्या व्यक्तीला एकतर विधानसभा नाहीतर विधानपरिषद अशापैकी एका सदनाचे आमदार असावे लागते. विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी येत्या 20 जून रोजी निवडणूक होणार आहे. 

आमशा पाडवी यांचं नाव आघाडीवर
दरम्यान, विधानपरिषदेसाठी शिवसेनेकडून नंदूरबार जिल्ह्यातले आमशा पाडवी (Amsha Padvi) यांना उमेदवारीची चर्चा आहे. आमशा पाडवी हे मुख्यमंत्र्यांच्या गुडबुकमधलं नाव आहे. आमशा पाडवी हे शिवसेनेतील आक्रमक आदिवासी चेहरा अशी त्यांची ओळख आहे.