माझ्या राजा रं....महापुरुषांना हृदयात ठेवा, गाडीच्या मागच्या काचेवर नाही

अनेक जण शिवाजी महारांजांच्या प्रेमापोटी आपल्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर स्टीकर लावतात.  

Updated: Dec 13, 2021, 06:42 PM IST
माझ्या राजा रं....महापुरुषांना हृदयात ठेवा, गाडीच्या मागच्या काचेवर नाही title=

मुंबई : स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणारे अवघ्या महाराष्ट्राचे आराध्यदैवत म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज. महाराज असं उच्चारलं तरी आपला उर अभिमानाने भरुन येतो. अंगावर शहारा उभा राहतो. महाराजांची ख्याती ही सर्वदूर आहे. महाराजांना मानणारा नाही, असा माणूस शोधून सापडणार नाही. (Video viral of 2 wheeler rider clearing dust on car sticker Chhatrapati Shivaji Maharaj during traffic) 

आपल्यापैकी अनेक जण हे शिवाजी महाराजांसारखी दाढी ठेवतात, मात्र त्यांचे विचारांचा वारसा पुढे नेणारे फारच कमी आणि मोजकेच असतात. अशाच एका शिवभक्ताचा व्हीडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

अनेक जण शिवाजी महारांजांच्या प्रेमापोटी आपल्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर स्टीकर लावतात. मात्र वाहतुकीमुळे तसेच प्रदूषणामुळे गाडीवर असलेल्या महाराजांच्या प्रतिमेवर धूळ जमा होते. मात्र तरीही हे वाहनमालक ते साफ करत नाहीत. 

अशाच चारचाकी गाडीच्या मागील बाजूच्या उजव्या कोपऱ्यात महाराजांचा स्टीकर लावला होता. यावर धूळ होती. प्रवासादरम्यान वाहतूक कोंडीत ही बाब एका शिवभक्ताच्या लक्षात आली. या शिवभक्ताने पाठचा पुढचा कोणताही विचार न करता आपल्याकडे असलेला कपडा काढत महाराजांचा स्टीकर स्वच्छ केला. या सर्व प्रकाराचा व्हीडिओ व्हायरल झालाय.

व्हायरल होणाऱ्या या व्हीडिओत जी चारचाकी दिसेतय, ती गाडी नक्की कुठली आहे हे स्पष्ट होत नाही. तरीही ही गाडी एमएच 48 या आरटीओची असल्याचं म्हंटलं जातंय.

हा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर या शिवभक्ताचं सर्वच स्तरातून तोंडभरुन कौतुक केलं जातंय. तर दुसऱ्या बाजूला या स्टीकर लावणाऱ्या चारचाकीच्या मालकाविरोधात प्रतिक्रिया उमटत आहेत.  

नेटकऱ्याचं म्हणंन काय? 

गाडीवर महाराजांच्या प्रतिमेचा स्टीकर लावयला हरकत नाही. मात्र हे स्टीकर एकतर गाडीच्या आतील बाजूला लावायला हवेत, जेणेकरुन ते स्वच्छ राहतील. तसेच जर गाडीच्या बाहेरच्या बाजूला स्टीकर लावायचा असेल, तर ते जबाबदारीने स्वच्छ करायला हवं, असं मत नेटीझन्सकडून व्यक्त केलं जात आहे.