मुंबई : सोमवारी दहीहंडीच्या निमित्तानं भाजप नेते राम कदम यांनी 'देशातील सर्वात मोठी' दहीहंडी उभारल्याचा दावा करत निवडणुकीआधी भाव खाण्याचा प्रयत्न केला... या दहीहंडीसाठी स्थानिकांनी एकच गर्दी केली होती... आणि या गर्दीसमोर राम कदम जरा जास्तच जोशात आले... आणि या जोशातच त्यांचा जीभेवरचा ताबा सुटला. गर्दीसमोर कोणतंही काम असल्यास आपल्याला संपर्क साधू शकता असं सांगताना राम कदम यांनी आपला मोबाईल क्रमांक जाहीर करून टाकलाच... शिवाय, तरुणांना सल्ला देताना त्यांचं भान सुटलं... तरुणांना कशी मदत करणार हे सांगताना कदम म्हणाले, 'एखाद्या तरुणीला प्रप्रोज केलं आणि ती नाही म्हणतेय, प्लीज मदत करा... मदत करणार... आधी तुमच्या आई-वडिलांना घेऊन यायचं... तुमचे आई-वडील म्हणाले, साहेब ही मुलगी पसंत आहे तर काय करणार मी?... तिला पळवून आणणार आणि तुम्हाला देणार'. अर्थातच, या वक्तव्यामुळे राम कदम पुन्हा एकदा टीकेचे धनी ठरलेत.
बेताल वक्तव्य करणारा भाजपा नेत्यांमध्ये आणखी ऐकाची भर.. रक्षाबंधन , दहिकाला उत्सव या पवित्र सणा दिवशी आमदाराने तोडले आपल्या अकलेचे तारे !
कशा राहतील यांचा राज्यात महिला सुरक्षित? pic.twitter.com/Z5JAx5ewrN— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) September 4, 2018
यावर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार टीका केलीय. 'बेताल वक्तव्य करणाऱ्या भाजपा नेत्यांमध्ये आणखी एकाची भर... रक्षाबंधन, दहिकाला उत्सव या पवित्र सणादिवशी आमदाराने तोडले आपल्या अकलेचे तारे! कशा राहतील यांचा राज्यात महिला सुरक्षित?' अशी प्रतिक्रिया त्यांनी सोशल मीडियावर व्यक्त केलीय.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या दहीहंडीला उपस्थिती लावली होती... त्यांच्यासमोरही राम कदम यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. यावेळी, 'माझं नाव जरी राम असलं तरी खऱ्या अर्थाने राम देवेंद्र फडणवीस आहेत... मी हनुमान बनून राहील आपण मला लंका दाखवा... पक्ष बदलला असला तरी कार्यशैली तशीच आहे' असं राम कदम यांनी म्हटलं. तर 'आज इतर दहीहंडी पहिल्या, पण घाटकोपरची दहीहंडी सर्वात मोठी आहे. भ्रष्टाचार अनाचाराची दहीहंडी आपण फोडल्याशिवाय राहणार नाही' असं म्हणतानाच 'राम भाऊ तुम्ही हनुमान बना पण आधुनिक हनुमानाने स्वतःच्या शेपटीला आग लावायची नाही...' असा सल्लाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी राम कदम यांना दिला.
एकेकाळचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि सध्या भाजपात असणारे राम कदम दरवर्षी दहीहंडीच्या निमित्तानं चर्चेत येतात. घाटकोपर भागात उभारण्यात येणारी राम कदम यांची दहीहंडी प्रसिद्ध आहे. लाखो रुपयांचं बक्षीस असणाऱ्या या दहीहंडीत बॉलिवूडचे कलाकारही सहभागी होतात...