स्वाती नाईक, झी २४ तास, नवी मुंबई : नवी मुंबईतल्या डीआयजी निशिकांत मोरे छेडछाड प्रकरणाला धक्कादायक वळण लागलंय. डीआयजी मोरेवर आरोप करणारी मुलगी घरातून बेपत्ता झालीय. त्यामुळं या प्रकरणाचं गूढ आणखीनंच वाढलंय.
पुण्याचे डीआयजी निशिकांत मोरे याच्यावर नवी मुंबईच्या तळोजा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे. ज्या मुलीच्या छेडछाडीचा आरोप आहे ती मुलगी घरातून बेपत्ता झालीय. आपल्या राहत्या घरातून सर्व झोपल्यानंतर रात्री ११ - १२ च्या दरम्यान सुसाईड नोट लिहून ही मुलगी बेपत्ता झाली आहे. या मुलीनं आत्महत्या करत असल्याचं चिठ्ठीत लिहून ठेवली आहे.
पीडित मुलीचे वडील आणि निशिकांत मोरे हे दोघंही मित्र आणि व्यावसायिक भागिदार आहेत. निशिकांत मोरे पीडित मुलीच्या वाढदिवसाला तिच्या घरी गेला होता. तिच्या चेहऱ्यावर जो केक लावण्यात आला तो केक हातानं चाटून खाताना निशिकांत मोरे व्हिडिओत दिसतोय. शिवाय तिच्याशी अभद्र व्यवहार केला. याचा व्हिडिओ पीडित कुटुंबाजवळ आहे.
या प्रकरणी सुरुवातीला पोलीस दाद देत नव्हते. पण शेवटी पोलिसांनी निशिकांत मोरेविरोधात गुन्हा दाखल केला. पोलीस निशिकांत मोरेचा शोध घेत असतानाच पीडित मुलगी घरातून नाहिशी झालीय. घरातून जाताना लिहिलेल्या चिठ्ठीत 'माझ्या आत्महत्येला निशिकांत मोरे जबाबदार आहे' असंही ती लिहून गेलीय.
या प्रकरणात थेट पोलीस उपमहानिरीक्षक आरोपीच्या पिंजऱ्यात आहे. निशिकांत मोरेवर विनयभंगाचे आरोप होण्यापूर्वी पीडित मुलीचे वडील आणि मोरेमध्ये आर्थिक वादही झाला होता. या प्रकरणाला अनेक कंगोरे असले तरी विषय गंभीर आहे. त्यामुळं पोलिसांनी तातडीनं आणि वेगानं तपास करण्याची गरज निर्माण झालीय.