आता विद्यार्थ्यांना थेट कुलगुरुंशी साधता येणार संवाद, मुंबई विद्यापीठाचा अनोखा उपक्रम

पहिल्या आणि तिसऱ्या बुधवारी विद्यापीठात ‘विद्यार्थी संवाद’ या कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. 

Updated: Mar 30, 2024, 09:27 PM IST
आता विद्यार्थ्यांना थेट कुलगुरुंशी साधता येणार संवाद, मुंबई विद्यापीठाचा अनोखा उपक्रम title=

Mumbai University Special Initiative For Student : मुंबई विद्यापीठातील विविध शैक्षणिक विभाग आणि संलग्नित महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता थेट कुलगुरू यांच्याशी संवाद साधता येणार आहे. मुंबई विद्यापीठाने ‘कुलगुरू संवाद’ या अभिनव उपक्रमाला सुरुवात केली असून, महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या बुधवारी विद्यापीठात ‘विद्यार्थी संवाद’ या कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी हे विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. विद्यार्थी संवाद उपक्रमासाठी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, कुलसचिव प्रा. बळीराम गायकवाड, परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालिका डॉ. पूजा रौंदळे आणि संबंधित अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

विद्यार्थ्यांच्या शंकेचे होणार निरसन

मुंबई विद्यापीठातील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रविष्ठ असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक व अनुषंगिक बाबींशी निगडीत प्रश्न, शंका, समस्या असतात. त्यांचे निरसन करण्यासाठी विद्यापीठात विद्यार्थी संवाद कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेता पात्रता आणि नावनोंदणी, गुणपत्रिका, पदवी प्रमाणपत्र यासह परीक्षा विभागाशी निगडीत बाबींचे प्राथम्याने निरसन करण्यावर भर दिला जाणार आहे.

विविध विषयांबाबतही मार्गदर्शन केले जाणार

विशेष म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने येत्या शैक्षणिक वर्षापासून मुंबई विद्यापीठातील सर्व बिगर संलग्नित महाविद्यालयात तीन आणि चार वर्षांचे सर्व विद्याशाखेचे अभ्यासक्रम राबवले जाणार आहेत. या अनुषंगाने विद्यापीठाने ठरवून दिलेल्या सहा व्हर्टिकल (घटक) नुसार विद्यार्थ्यासाठी उपलब्ध असलेल्या विविध मेजर, मायनर, ओपन इलेक्टिव्ह, व्होकेशनल स्कील कोर्सेस, एबिलिटी एनहान्समेंट कोर्सेससह भारतीय ज्ञान प्रणाली आणि कार्यांतर्गत प्रशिक्षण अशा विविध सहा व्हर्टिकल मधील विषयांबाबतही मार्गदर्शन केले जाणार आहे.

विद्यार्थ्यांनी ओळखपत्र आणणे अनिवार्य

‘विद्यार्थी संवाद’ या कार्यक्रमाचे एप्रिल महिन्याचे नियोजन हे दिनांक 03 एप्रिल आणि 18 एप्रिल 2024 रोजी सकाळी 11 ते 12.30 वाजेदरम्यान मुंबई विद्यापीठाच्या विद्यानगरी संकुलातील छत्रपती शिवाजी महाराज भवन (नवीन परीक्षा भवन) येथे करण्यात आले आहे. या उपक्रमात सहभागी होणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी त्यांचे ओळखपत्र सोबत आणने अनिवार्य असेल. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी विद्यापीठात तक्रार निवारण समिती कार्यरत असून विद्यार्थी विकास विभागामार्फत याचे कामकाज पाहिले जाते. विद्यार्थ्यांचे व्यापक शैक्षणिक हित लक्षात घेता विद्यापीठामार्फत लोकपाल नियुक्ती करण्यात आली आहे.