LokSabha: शरद पवार गटाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर; कोल्हे, सुप्रिया सुळेंसह निलेश लंकेंच्या नावाची घोषणा

LokSabha: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवार गटाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये बारामती आणि शिरुरसारख्या महत्त्वाच्या मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केली आहे

शिवराज यादव | Updated: Mar 30, 2024, 05:44 PM IST
LokSabha: शरद पवार गटाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर; कोल्हे, सुप्रिया सुळेंसह निलेश लंकेंच्या नावाची घोषणा title=

LokSabha: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवार गटाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये बारामती आणि शिरुरसारख्या महत्त्वाच्या मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केली आहे. अपेक्षेप्रमाणे बारामतीमधून सुप्रिया सुळे आणि शिरुरमधून अमोल कोल्हे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महत्त्वाचं म्हणजे अहमदनगरमधून निलेश लंके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. निलेश लंके अजित पवार गटातून शरद पवारांकडे स्वगृही परतले असून, शुक्रवारी आमदारकीचा राजीनामा दिला. 

मुंबईत शरद पवार गटाची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी जयंत पाटील यांनी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यामध्ये एकूण 5 उमेदवारांचा समावेश करण्यात आला. वर्धा येथून अमर काळे, दिंडोरीमधून भास्कर भगरे, बारामतीमधून सुप्रिया सुळे, शिरुरमधून अमोल कोल्हे आणि अहमदनगरमधून निलेश लंके यांच्या नावाची घोषणा केली. 

उमेदवारांची यादी खालीलप्रमाणे - 

वर्धा - अमर काळे
दिंडोरी - भास्कर भगरे
बारामती - सुप्रिया सुळे
शिरुर - अमोल कोल्हे
अहमदनगर - निलेश लंके

काँग्रेस, शिवसेना आणि आमचे सर्व मित्रपक्ष यांच्याशी बरीच चर्चा झाली आहे. आघाडीने त्यातून काही निष्कर्ष काढले आहेत. पक्षाच्या संसदीय समितीची बैठक झाल्यानंतर हे उमेदवार अंतिन करण्यात आले आहेत अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली. दुसरी यादी लवकरच जाहीर करु असंही जयंत पाटील यांनी सांगितलं आहे. 

भाजपाला पराभूत करण्यासाठी सगळ्यांनी एकीचं बळ दाखवण्याची गरज आहे. काहीजण वेगळं उभं राहण्याची भाषा करतील तर त्यामुळे मतं फुटतील आणि भाजपाला मदत होतील. सगळे एकसंघ होण्याचा प्रयत्न झाला पाहिजे असं जयंत पाटील म्हणाले आहेत. महाविकास आघाडीची चर्चा संपली आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं. 

गोविंदाबद्दल माझं जे मत होतं ते मी मांडलं होतं. गोविंदा माझ्यापेक्षा चांगलाच अभिनेता आहे. पण निवडून येऊ शकतो इतका चांगला नाही असं म्हणायचं होतं असं प्रत्युत्तर जयंत पाटील यांनी एकनाथ शिंदे यांना दिलं.

वंचित बहुजन आघाडी आमच्याबरोबर यावी असा आमचा प्रयत्न आहे. तसंच इतरही कोणी सोबत येत असेल तर त्यासाठी प्रयत्न सुरु आहेत असं जयंत पाटील यांनी म्हटलं. 

शिंदे गट आणि भाजपाविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार

शरद पवार गटाने भाजपा आणि शिंदे गटाविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. "लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने स्टार प्रचारकांची यादी जाहीर झाली आहे. ज्यांची नाव जाहीर झाली त्यात त्यांची पदं नमूद करण्यात आली आहेत. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या नावाच्या पुढे पंतप्रधान असं नमूद करण्याच आलं आहे. ही निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेचा भंग आहे," असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत. 

शिवसेनेच्या स्टार प्रचारकांच्या यादीत भाजपा आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची नावं आहेत. हा देखील आचारसंहितेचा भंग आहे. याबाबत आम्ही तक्रार दिली असून पुरावे देखील सादर केले आहेत अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.