Vaishali Shinde Passed Away : आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ गायिका वैशाली शिंदे (Vaishali Shinde) यांचं शुक्रवारी निधन झालं आहे. वैशाली शिंदे यांनी वयाच्या 62व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. आंबेडकरी चळवळीत सक्रीय गायिका वैशाली शिंदे यांचे गुरुवारी संध्याकाळी सात वाजता केईम रुग्णालयात (KEM Hospital) दुःखद निधन झालं. शुक्रवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. घाटकोपरमधील भटवाडी स्मशानभूमीत त्यांचा अंत्यविधी पार पडणार आहे. वैशाली शिंदे यांच्या पश्चात एक मुलगा आहे.
वैशाली शिंदे यांना मधुमेहाचा आजार होता. मधुमेह असतानाच शिंदे यांच्या पायाला गँगरीन झालं होतं. केईएम रुग्णालयात त्यांच्यावर गँगरीन उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यानच वैशाली शिंदे यांची प्राणज्योत मालवली. घाटकोपर येथील भटवाडी स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
गायिका वैशाली शिंदे यांनी त्यांच्या गाण्यांमधून आंबडेकरी चळवळीत मोठं योगदान दिलं होतं. 4 एप्रिल 1962 मध्ये सोलापुरातील मोहोळ तालुक्यात त्यांचा जन्म झाला होता. वैशाली शिंदे यांना त्यांच्या आई-वडिलांकडून गाण्याचे बाळकडू मिळाले. त्यांचे आई - वडील रामचंद्र आणि सरुबाई क्षीरसागर हे दोघंही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची गाणी म्हणत असत. वैशाली शिंदे यांनाही या गाण्यांची ओढ लागली आणि त्यांनी गाण्यास सुरुवात केली.