मुंबईत भाज्यांचे दर वाढले, तुम्हाला मिळणारी भाजी शेतकऱ्यांकडून किती रुपयाला खरेदी केली जाते?

मुंबईतील बाजारातील भाज्यांचे दर काय आहेत एकदा पाहाच...

Updated: Mar 25, 2020, 12:31 PM IST
मुंबईत भाज्यांचे दर वाढले, तुम्हाला मिळणारी भाजी शेतकऱ्यांकडून किती रुपयाला खरेदी केली जाते? title=

मुंबई : कोरोना व्हायरसमुळे केलेल्या लॉकडाऊनमध्ये कुणी संकटात संधी शोधू नका असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला असला तरी मुंबईच्या भाजी बाजारात आज भाज्यांचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. लोक भाजी घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करत असल्यानं बाजारात भाज्यांचे दर वाढवल्याचं दिसून येत आहे.

मुंबईची परसबाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकच्या घाऊक बाजारात असलेल्या दराच्या कितीतरी अधिक दर मुंबईच्या भाजी मार्केटमध्ये दिसत आहेत. जीवनावश्यक वस्तुंचा तुटवडा होणार नाही असं राज्य सरकारनं अनेकदा जाहीर केलं असलं तरी २१ दिवसांचं लॉकडाऊन असल्यानं लोक जास्तीत जास्त भाजी खरेदी करत आहेत. त्यामुळे भाज्यांचे भावही कडाडले आहेत.

नाशिकच्या घाऊक बाजारात १० ते १२ रुपये किलोनं मिळणारा टॉमेटो मुंबईत ३० ते ४० रुपयांना विकला जात आहे. तर ५ रुपये किलोने मिळणारी कोबी मुंबईच्या भाजी बाजारात ६० रुपये किलोनं मिळत आहे. तर नाशिकच्या घाऊक बाजारात ६ रुपये असलेली फ्लॉवर मुंबईत ६० ते ८० रुपये किलोनं मिळत आहे. नाशिकमध्ये २० रुपये किलोनं मिळणारी दुधी मुंबईत ६० रुपये किलोनं विकली जात आहे.

लॉकडाऊनमुळे लोक मोठ्या प्रमाणात अन्नधान्य आणि भाजी खरेदी करत आहेत. त्याचा गैरफायदा काही व्यापारी आणि दलाल घेत असण्याची शक्यता आहे. त्यामुळे संधीचा गैरफायदा घेऊन बाजारातील भाज्या आणि वस्तुचे भाव विनाकारण वाढणार नाहीत यासाठी सरकारनं खबरदारी घेण्याची गरज आहे. तसेच लोकांनीही विनाकारण मोठ्या प्रमाणात गर्दी करून गरजेपेक्षा अधिक साठा करण्याची गरज नाही. सरकारनं याबाबत यंत्रणेला सतर्क करण्याची गरज आहे.

विशेष म्हणजे लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवा म्हणून भाजी विक्री सुरु राहणार असली तरी त्याचा फायदा शेतकऱ्यांना होताना दिसत नाही. कारण शेतकऱ्यांकडून पडेल भावात मिळणारा भाजीपाला मुंबई आणि अन्य शहरांच्या मार्केटमध्ये अधिक भावात विकला जात असला तरी त्याचा फायदा व्यापारी आणि दलालांनाच होणार असल्याचं हे दर पाहता लक्षात येतं.

नाशिकचे घाऊक मार्केट आणि मुंबईतील बाजारातील भाज्यांचे दर पुढील प्रमाणे

भाजी   नाशिक मार्केट (घाऊक प्रतिकिलो) मुंबई (किरकोळ प्रतिकिलो)
टॉमेटो  १२ रुपये                           ३०-४० रुपये
कोबी                                  ५ रुपये   ६० रुपये
भेंडी  १७ रुपये    ८० रुपये
वाटाणा १०-१५ रुपये       १०० रुपये
गवार  ३५ रुपये   ८० रुपये
फ्लॉवर ६ रुपये     ६०-८० रुपये
दुधी  २० रुपये   ६० रुपये
भोपळा  १६ रुपये  ४० रुपये
काकडी १८ रुपये  ४० रुपये
कोथिंबीर   ५ रुपये जुडी   १० रुपये जुडी