नागपुरहून नवी मुंबईला येईपर्यंत बदलली तारीख; आता या तारखेला सुरु होणार Navi Mumbai Airport

Navi Mumbai International Airport : शुक्रवारी नागपूरात बोलताना केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री जोतिरादित्य शिंदे यांनी हे विमानतळ याच वर्षी नोव्हेंबर अथवा डिसेंबर महिन्यात सुरु होईल असे सांगितले होते. मात्र कामाची पाहणी केल्यानंतर यासाठी पुढचे वर्ष लागणार आहे असे शिंदे म्हणाले.

आकाश नेटके | Updated: Jan 14, 2024, 02:14 PM IST
नागपुरहून नवी मुंबईला येईपर्यंत बदलली तारीख; आता या तारखेला सुरु होणार Navi Mumbai Airport title=
(प्रातिनिधीक छायाचित्र)

Navi Mumbai International Airport​ : गेल्या काही वर्षापासून नवी मुंबईत होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. येत्या वर्षभरात हे विमानतळ प्रवाशांच्या सेवेत असणार असल्याची शक्यता केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री जोतिरादित्य शिंदे यांनी व्यक्त केली आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाची शनिवारी दुपारी पहाणी केल्यानंतर मंत्री जोतिरादित्य शिंदे यांनी हे विमानतळ 31 मार्च 2025 रोजी पर्यत कार्यान्वित होऊ शकेल, असे सांगितलं आहे.

केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी शनिवारी नवी मुंबईत बांधल्या जाणाऱ्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा आढावा घेतला. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा केवळ मुंबई किंवा महाराष्ट्रासाठी पायाभूत सुविधांचा प्रकल्प नसून तो संपूर्ण देशासाठी अभिमानाचा प्रकल्प आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विकासाचा आढावा घेण्यासाठी ते नवी मुंबईत आले होते. यावेळी मंत्री शिंदे यांनी प्रसारमाध्यमांना प्रकल्पाच्या सद्यस्थितीची माहिती दिली.

काय म्हणाले ज्योतिरादित्य शिंदे?

"मुंबईच नव्हे तर देशाच्या विकासात मैलाचा दगड ठरणारे हे विमानतळ डिसेंबर 2024 पर्यत प्रवाशांच्या सेवेत असावे असे लक्ष्य आम्ही समोर ठेवले आहे. मात्र याठिकाणच्या कामाची सद्यस्थिती आणि इतर प्राधिकरणांमार्फत सुरु असलेल्या पुरक कामांचे अवलंबित्व लक्षात घेतले तर हा अंदाज थोडा अधिकचा म्हणायला हवा. असे असले तरी या कामाची भौतिक आणि आर्थिक प्रगती लक्षात घेता 31 मार्च 2025 पर्यत मात्र या विमानतळाचा पहिला आणि दुसरा टप्पा प्रवाशांच्या सेवेसाठी नक्की खुला होईल," असे ज्योतिरादित्य शिंदे यांनी म्हणाले.

अठरा हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पामुळे मुंबईच्या कनेक्टिव्हिटीला मोठा फायदा होणार असून तो 5 टप्प्यात राबविण्यात येणार आहे. भौतिक आणि आर्थिक प्रगती 55-60 टक्के पूर्ण झाली आहे. प्रकल्पाची सुरुवात 2018 मध्ये झाली आणि 31 मार्च 2025 पर्यंत कामकाज सुरू होण्याची अपेक्षा आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात एक धावपट्टी आणि दोन कोटी प्रवासी क्षमता असलेलं एक टर्मिनल बांधण्यात येणार आहे. फेज 3, 4 आणि 5 मध्ये, दुसरा रनवे, नऊ कोटींच्या वाढीव प्रवासी क्षमतेसह चार टर्मिनल बांधले जातील. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर भविष्यात रस्ते, रेल्वे आणि मेट्रो कनेक्टिव्हिटीसह जल वाहतूक कनेक्टिव्हिटीचेही नियोजन केले जाईल, असेही शिंदे म्हणाले.

"नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे देशातील पहिले विमानतळ असेल, ज्यामध्ये शहराच्या दिशेने 1600 हेक्टर आणि विमानतळावर दहा किलोमीटर अंतरावर स्वयंचलित प्रवासी वाहतूक होईल. पहिल्या टप्प्यात 100 टक्के हरित विमानतळ बांधले जात आहे. विमानतळामुळे देशातील हवाई वाहतूक वाढेल, अशी अपेक्षा आहे. 2030 पर्यंत देशातील देशांतर्गत प्रवासी वाहतूक सध्याच्या 15 कोटींवरून 30 कोटींपर्यंत दुप्पट करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. येत्या सहा वर्षांत देशात 200 हून अधिक विमानतळ बांधण्याचा संकल्पही आहे," असे शिंदे यांनी म्हटलं.