फिरता दवाखाना लोकार्पण कार्यक्रमात उद्धव ठाकरेंचे अजब विधान

 फिरत्या दवाखान्यांचा (मोबाईल मेडिकल युनिट) शुभारंभ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला.

Updated: Oct 19, 2018, 08:00 PM IST
फिरता दवाखाना लोकार्पण कार्यक्रमात उद्धव ठाकरेंचे अजब विधान title=

मुंबई : यापूर्वी विरोधी पक्षात नक्कीच होतो, आता मात्र नेमकं कुठं आहोत, हेच समजत नाही, असे अजब विधान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलंय. सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे फिरत्या दवाखान्यांचं लोकार्पण मुंबईत त्यांच्या हस्ते झालं. यावेळी विरोधी पक्षात असताना आदिवासी भागात शिवसेनेनं केलेल्या आरोग्यविषयक कामांची आठवण ठाकरेंनी काढली. यावेळी आता कुठे आहोत, हेच समजत नसल्याचं ठाकरे बोलून गेले.

काल दसरा मेळाव्यातल्या भाषणात ठाकरेंनी भाजपावर तोंडसुख घेतलं होतं. इतकी टीका करूनही भाजपसोबत सत्तेत राहणं उद्धव ठाकरेंना मान्य आहे. यावरून शिवसेनेवर टीका होत असतानाच पक्षप्रमुख स्वतःच आपण कुठे आहोत, हे कळत नसेल तर शिवसैनिकांनी मतदारांना काय उत्तर द्यायचं, हा प्रश्न आहे, अशी कुजबूज सुरु झालेय. दमरम्यान, सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे फिरत्या दवाखान्यांचा (मोबाईल मेडिकल युनिट) शुभारंभ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात योजनेचे लोकार्पण झाले.

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यातील 6 शहरांमध्ये 10 फिरत्या दवाखान्यांची सुविधा पुरवली जाणार आहेत. यामध्ये मुंबईत 5 फिरते दवाखाने असणार आहेत. तर नागपूर, औरंगाबाद, नवी मुंबई-पनवेल, कोल्हापूर या  शहरांमध्ये प्रत्येकी एक फिरता दवाखाना असणार आहे. या फिरत्या दवाखान्यात 1 डाँक्टर,1 नर्स,1 लँब टेक्निशियन,1 फार्मासिस्ट,1 वाहनचालक यांचा समावेश असणार आहे.  प्रामुख्याने हा फिरता दवाखाना शहरातील झोपडपट्टी भागात सेवा देणार आहे. तर राज्याच्या ग्रामीण भागात यापूर्वीच ४० फिरते दवाखाना कार्यरत आहेत.  या फिरत्या दवाखान्यात डॉक्टर, परिचारिकेसह, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि फार्मासिस्टही असणार आहेत.

अत्यावश्यक प्राथमिक आरोग्य सेवांसह निदानात्मक सुविधा पुरवली जाईल. या दवाखान्यातून प्राथमिक उपचार, कुटुंबनियोजन, प्रसुतीपूर्व आणि प्रसुतीपश्चात सेव, लसीकरण, साथरोग नियत्रंण, समुपदेशनची सेवा दिली जाणार आहे.