Uddhav Thackeray: 'निवडणूक आयुक्तांनी गुलामी केली, चोरांना निवडणुकीत गाडल्याशिवाय...'; भरचौकात उद्धव ठाकरेंचं भाषण

Uddhav Thackeray Speech: कलानगरच्या चौकामध्ये उद्धव ठाकरेंनी समर्थकांशी संवाद साधताना ओपन जीमधून भाषण देताना शिंदे गटाबरोबरच भाजपावर निशाणा साधला.

Updated: Feb 18, 2023, 04:18 PM IST
Uddhav Thackeray: 'निवडणूक आयुक्तांनी गुलामी केली, चोरांना निवडणुकीत गाडल्याशिवाय...'; भरचौकात उद्धव ठाकरेंचं भाषण title=

Uddhav Thackeray Speech on Jeep: केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) 'शिवसेना' (Shiv Sena) हे नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या गटाला दिल्यानंतर आज उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) कलानगरच्या चौकामध्ये शिवसैनिकांशी ओपन जीपमधून संवाद साधला. यावेळी उद्धव यांनी 'चोर' आणि 'चोर बाजाराचे मालक' असा उल्लेख करत मुख्यमंत्री शिंदे आणि भारतीय जनता पार्टीवर निशाणा साधला. जोपर्यंत तुमच्यासारखे समर्थक आणि शिवसैनिक आहेत तोपर्यंत कोणाच्या कितीही पिढ्या आल्या तरी शिवसेना संपवू शकत नाही, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. 

Shivsena Crisis: उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे...

चोरांना निवडणुकीत गाडल्याशिवाय...

"आपलं धनुष्यबाण जे तुम्ही मेहनतीने कमवलेलं होतं ते चोरीला गेलं आहे. ते कोणी चोरलं हे तुम्हाला माहितीय. या चोरबाजाराचे मालक पण तुम्हाला माहिती आहेत. यापुढे चोरबाजाराच्या मालकांना आणि चोरांना निवडणुकीत गाडल्याशिवाय स्वस्त बसायचं नाही," असं आवाहन उद्धव ठाकरेंनी समर्थकांना केलं. तसेच, "योगायोग असेल काहीही असेल आज महाशिवरात्र आहे उद्या शिवजयंती आहे. जणू काही या दिवसांचा मुहूर्त पाहून शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चोरलं गेलं आहे. मात्र ज्यांनी चोरलं आहे त्यांना ठाऊक नाही त्यांनी मधमाशाच्या पोळ्यावर दगड मारलेला आहे. आजपर्यंत मधमाशांनी जमलेल्या मधाचा स्वाद घेतला. मात्र आता त्यांना डंक मारायची वेळ आलीय," असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

निवडणूक आयुक्तांची गुलामगिरी

"मला माहितीय तुम्ही चिडलेले आहात. मात्री 75 वर्षांच्या लोकशाहीमध्ये असा प्रकार कोणत्याही राजकीय पक्षाबरोबर घडला नसेल. निवडणूक आयुक्तांनी गुलामी केली आहे. मी मुद्दाम गुलामी म्हणतोय कारण त्यांनी अनेक गुलाम आजूबाजूला ठेवले आहेत. नुकतेच एक न्यायमूर्ती राज्यपाल झाले आहेत. त्यांनी आजूबाजूला ठेवलेल्या गुलामांना आव्हान देतोय मी शिवसेना कोणाची हे तुम्ही ठरवू शकत नाही. आता हे जनतेचं ठरवायची वेळ आलेली आहे. कोणालाही विचारा शिवसेना कोणाची आहे ते सांगतील," असा टोला उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाला लगावला.

कोणाच्या कितीही पिढ्या उतरल्या तरी..

आता मी तुम्हाला भेटायला आलोय रस्त्यावर. तुमच्यासोबत पहिल्या पासून होतो. आता खांद्यावर शिवरायांचा भगवा घेऊन राजकारणातील या चोरांचा नायनाट केल्याशिवाय राहायचं नाही, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना केलं. तुमच्यासारखे शिवसैनिक जिवंत आहेत तोपर्यंत कोणाच्या कितीही पिढ्या उतरल्या तरी शिवसेना संपू शकत नाही, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. कलानगरमध्ये ओपन जीपमधून उद्धव यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला तेव्हा त्यांच्याबरोबर आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे आणि पत्नी रश्मी ठाकरेही होत्या. यावेळेस ठाकरे समर्थकांनी उद्धव यांचं भाषण ऐकण्यासाठी मोठी गर्दी केली होती.