मुंबई : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची मुंबईत एका खासगी सोहळ्यात भेट झाली आणि राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा झडत आहे. पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त पद्मनाभन यांच्या मुलाच्या लग्नात या दोन नेत्यांची भेट झाली. वरळीत मे फेअर इथे हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी भुजबळ ठाकरे यांच्यात बराचवेळ चर्चा रंगली. या भेटीचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
छगन भुजबळ आणि उद्धव ठाकरे यांच्यात चांगल्या गप्पा रंगल्यामुळे राजकीय तर्कांनाही उधाण आलेय. या दोघांची भेट आणि त्यांच्यात रंगलेल्या गप्पा हा राजकीय चर्चेचा विषय ठरला आहे. पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त पद्मनाथन यांच्या मुलाचे लग्न मुंबईत पार पडले. या लग्नात या दोन्ही नेत्यांसह सगळ्याच दिग्गज नेत्यांची हजेरी होती. मात्र चर्चा रंगली ती उद्धव ठाकरे आणि छगन भुजबळ यांच्या भेटीचीच. उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेना खासदार संजय राऊतही होते. या दोघांनी कोणत्या विषयावर गप्पा मारल्या हे अद्याप गुलदस्त्यात आहे.
दरम्यान, शिवसेना म्हणजे छगन भुजबळांची आक्रमकता. मात्र त्यांनी शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र केला आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यांचा उल्लेख लखोबा म्हणून करत. शिवसैनिकांनी तर त्यांच्या नावापुढे गद्दार असे विशेषण जोडले होते. मात्र अनेक वर्षांनी हे मतभेद मागे सारत हे दोन नेते एकमेकांना भेटले. त्यांनी एकमेकांशी गप्पाही मारल्या. छगन भुजबळांना तुरुंगात जावे लागले तेव्हा शिवसेनेने त्यांच्या बाबत सहानुभूतीही व्यक्त केली होती.