उद्धव ठाकरे यांचं अमित शाह यांना थेट आव्हान, हिंमत असेल तर...

उद्धव ठाकरे यांनी अमित शाहा यांना आव्हान दिले आहे.

Updated: Sep 21, 2022, 08:50 PM IST
उद्धव ठाकरे यांचं अमित शाह यांना थेट आव्हान, हिंमत असेल तर... title=

मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज मुंबईत सभा घेतली. यावेळी त्यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवरुन (BMC Election) देखील त्यांनी गृहमंत्री अमित शाहा यांना थेट आव्हान दिलं आहे. 'तुमचे कोणतेही डावपेच यशस्वी होणार नाहीत. तुम्ही हिंदू मुस्लीम करुन बघा. आज मुस्लीम लोकं देखील शिवसेनेसोबत आहेत. अमराठी लोकं पण आमच्यासोबत आहेत. कोरोना काळात मुख्यमंत्री कोणताही भेदभाव न करता सगळ्यांचे प्राण वाचवले आहेत. 

'शिवसेनेचे हिंदुत्व मुस्लीमांना देखील कळत आहे. १९९२-९३ मध्ये सुद्धा कित्येक शिवसैनिकांनी दर्ग्याचे रक्षण केलं आहे. कारण हीच आमची शिकवण आहे," असे उद्धव ठाकरे म्हणाले.

अमित शाहांना आव्हान

'तुमची जी शाह निती आहे त्यावर मी दसऱ्याला बोलणार आहे. तुमचे चेले चपाटे येथे जे बसले आहेत त्यांना सांगा हिंमत असेल तर मुंबई महापालिका निवडणूक महिन्याभरात घेऊन दाखवा. पुढे हिंमत असेल तर महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक घेऊन दाखवा. कुस्ती आम्हाला पण येते. आमची पंरपरा तर तीच आहे. कोणाच्या पाठीला कोण माती लावतं पाहुयात.'

शिंदे गटावर टीका

बातम्या येत आहेत काही नगरसेवक जाणार आहेत. जे जाणार आहेत त्यांनी आताच निघून जा. बुडबुडे जास्त काळ टिकत नाहीत. मोठे करणारे माझ्या सोबत आहेत. घाबरुन जाण्याची परिस्थिती नाही. ही एक सुवर्ण संधी आहे. 

संघर्ष व रक्तपात झाला तर शिवसैनिकांत होईल. कमळाबाईचा नाही. त्यामुळं हे टाळतो. रक्त पिणारे हे गोचिड होते. गद्दारांपेक्षा मूठभर शिवसैनिक बरे. आयुष्यातील पहिली निवडणूक आहे असं समजून लढा. नव्याने भगवा लावायचा आहे.