अनिकेत पेंडसे, झी मीडिया, मुंबई : Shivsena and Shivaji Park: शिवसेना म्हटलं की दोन गोष्टी हमखासपणे डोळ्यासमोर उभ्या राहतात. एक म्हणजे दादरचं शिवसेना भवन आणि दुसरं म्हणजे शिवाजी पार्कवर लाखो शिवसैनिकांच्या साक्षीनं होणारा दसरा मेळावा. कमरेवर हात ठेवून गर्जना करणारे 'ठाकरे'... पण शिवाजी पार्क शिवसेनेसाठी शिवतीर्थ कसं झालं, कधी झालं, मुळात माहिम पार्कचं शिवाजी पार्क का झालं? ठाकरेंच्या चार पिढ्या आणि शिवाजी पार्कचं नेमकं नातं काय आहे?
अरबी समुद्राच्या समोर पसरलेलं 28 एकरांचं हे विस्तीर्ण मैदान ब्रिटीश काळात म्हणजे 1925 मध्ये तयार करण्यात आलं. 1927 मध्ये बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या तत्कालीन सदस्य अवंतिका गोखलेंच्या पुढाकारानं माहिम पार्कचं नाव शिवाजी पार्क झालं. लोकवर्गणीतून या ठिकाणी शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला. संयुक्त महाराष्ट्राचा लढा जेव्हा ऐन भरात होता त्याकाळात शिवाजी पार्कला शिवतीर्थ म्हटलं जाऊ लागलं. विशेष म्हणजे आचार्य अत्रे या मैदानाला शिवतीर्थ म्हणायचे. आचार्य अत्रेंच्या सभांच्या फलकांवर शिवाजी पार्कऐवजी शिवतीर्थ असा उल्लेख असायचा.
आचार्य अत्रेंप्रमाणेच शिवसेनाही शिवाजी पार्कला शिवतीर्थ म्हणायची. 'प्रबोधनकार' ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आता आदित्य ठाकरे.. ठाकरे कुटुंबातल्या चारही पिढ्यांचा राजकीय, सामाजिक इतिहास शिवाजी पार्कशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. कारण संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळात शिवाजी पार्कमध्ये होणाऱ्या सभांमध्ये प्रबोधनकार ठाकरेंचा सहभाग असायचा. बाळासाहेब हे नाव तर शिवाजी पार्कशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. शिवसेनेचा जन्म शिवाजी पार्क परिसरातला.. रानडे रोडवरच्या ठाकरेंच्या जुन्या घरातला.. ठाकरेंच्या कुंचल्याची तोफ..'मार्मिक'चा जन्मही इथलाच.
13 ऑगस्ट 1960ला मार्मिकचा जन्म झाला. 19 जून 1966 ला शिवसेनेची स्थापना झाली, त्यानंतर शिवाजी पार्कमध्ये पहिलावहिला दसरा मेळावा झाला 30 ऑक्टोबर 1966ला. 1966 ते 2019 या मैदानावर अखंडपणे शिवसेनेचा दसरा मेळावा होता, त्यामुळेच 1966 पासून शिवसेना आणि दसरा मेळावा हे नातं अतूट आहे. अखंड आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदा युतीचं सरकार आलं, त्यावेळी मनोहर जोशी शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री झाले, त्यांनी शपथ घेतली ती शिवाजीपार्कवरच. उद्धव ठाकरे शिवसेना कार्याध्यक्ष झाल्यानंतर पहिलं जाहीर भाषण त्यांनी केलं ते शिवाजी पार्कवरच. माझ्या उद्धवला सांभाळा, आदित्यला सांभाळा हे भावनिक शब्द बाळासाहेबांनी काढले ते याच शिवतीर्थावर. बाळासाहेब ठाकरेंचं निधन झालं त्यानंतर बाळासाहेबांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले ते याच शिवतीर्थावर.
याच शिवाजी पार्कवर ठाकरेंच्या चौथ्या पिढीचं म्हणजे आदित्य ठाकरेंचं लाँचिंग झालं. बाळासाहेब ठाकरेंनी आदित्यला इथेच तलवार दिली होती. फक्त बाळासाहेब, उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे नाहीत तर राज ठाकरेंनी मनसेची स्थापना केली त्यानंतर पहिली सभा इथेच घेतली. ठाकरेंचं असं अतूट नातं असणाऱ्या शिवाजी पार्कला 2010मध्ये मुंबई हायकोर्टानं सायलंट झोन म्हणून घोषित केलं. तरीही वार्षिक मेळावे घ्यायची परवानगी शिवसेनेला कोर्टानं दिली होती. 2019 ला शेवटचा दसरा मेळावा या मैदानावर झाला कारण त्यानंतर कोरोना आला.. कोरोनामुळे 2020 चा दसरा मेळावा ऑनलाईन पद्धतीनं घेण्यात आला तर 2021 ला सायनच्या ष्णमुखानंद सभागृहात 50 % उपस्थितीसह दसरा मेळावा पार पडला.
आज इतिहासात पहिल्यांदाच शिवतीर्थावरचा शिवसेनेचा दसरा मेळावा अस्तित्वाच्या लढाईत सापडलाय. खरं तर शिवाजी पार्कचं शिवतीर्थ झालं ते शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यामुळेच.. त्यामुळे काळाच्या ओघात शिवसेना आणि शिवाजी पार्क एकमेकांची ओळख बनले, आपसूक दोघांमध्ये एक नातं तयार झालं.. पण आता शिवसेना कुणाची हाच वाद सुरूय. त्यामुळे शिवसेना आणि शिवतीर्थाचं नातंच धोक्यात आलंय, असं म्हणायला वाव आहे.
हा लेख तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. लेख आवडला असेल तर तुमच्या व्हाट्सअप ग्रुपवर,फेसबुक ग्रुपवर शेअर करायला विसरू नका.