'आदित्य नव्हे तर उद्धव ठाकरेच मुख्यमंत्रीपदासाठी अधिक सक्षम'

पण ते एकदम मुख्यमंत्रीपद संभाळू शकतील असे वाटत नाही.

Updated: Oct 13, 2019, 10:55 AM IST
'आदित्य नव्हे तर उद्धव ठाकरेच मुख्यमंत्रीपदासाठी अधिक सक्षम' title=

मुंबई: आदित्य ठाकरे यांच्याऐवजी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री व्हावे, अशी अपेक्षा रिपाई अध्यक्ष रामदास आठवले यांनी व्यक्त केली. ते शनिवारी मुंबईत बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, आदित्य ठाकरे यांचा मी आदर करतो. मात्र, त्यांच्यापेक्षा उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदासाठी अधिक सक्षम पर्याय आहेत. परंतु, आगामी निवडणुकीत भाजपच्या जास्त जागा निवडून येणार असल्याने देवेंद्र फडणवीस हेच भावी मुख्यमंत्री असतील, असे आठवले यांनी सांगितले. 

राजकारणात कधी काहीही होऊ शकते. शिवसेनेच्या जास्त जागा आल्या तर आदित्य ठाकरे यांचा मुख्यमंत्रीपदासाठी नंबर लागेल. त्यावेळी आदित्यऐवजी तुम्हीच मुख्यमंत्री व्हा, असे मी उद्धव ठाकरे यांना सांगेन. आदित्य ठाकरे यांच्याविषयी आम्हाला आदर आहे. पण ते एकदम मुख्यमंत्रीपद संभाळू शकतील असे वाटत नसल्याचे रोखठोक मत आठवले यांनी मांडले.

आदित्य ठाकरे वरळीतून विधानसभेच्या रिंगणात उतरणार आहेत. त्यासाठी शिवसेनेने संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. आदित्य हे ठाकरे घराण्यातील निवडणूक लढवणारी पहिली व्यक्ती असतील. गेल्या काही दिवसांमध्ये आदित्य ठाकरे जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून राज्याच्या अनेक भागांमध्ये फिरले आहेत. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीविषयी चांगलीच वातावरणनिर्मिती करण्यात सेनेला यश आले होते. 

याशिवाय, शिवसेनेच्या अनेक नेत्यांकडून आदित्य ठाकरे राज्याचे भावी मुख्यमंत्री असल्याची वक्तव्ये करण्यात आली होती. आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यानंतर संजय राऊत यांनी आता शिवसेनेचे 'सूर्ययान' मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर सुखरूपपणे उतरेल, असा दावा केला होता.