मुंबई: राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी अखेर राहुल गांधी प्रचारासाठी मैदानात उतरणार आहेत. धारावी आणि चांदिवली मतदारसंघांमध्ये रविवारी त्यांच्या सभा होणार आहेत. मात्र, मुंबई काँग्रेसमध्ये माजलेल्या दुफळीमुळे या प्रचारसभांचा काँग्रेसला खरंच फायदा होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मुंबई काँग्रेसमधील मिलिंद देवरा आणि संजय निरूपम या दोन प्रमुख नेत्यांमधील वैर कायमच चर्चेचा विषय असतो. यामुळे मुंबईतील पक्षसंघटनेत मोठी फूट पडली आहे. यापैकी मिलिंद देवरा यांनी लोकसभेतील पराभवानंतर आत्मचिंतन करत आहेत. ते सध्या केवळ ट्विटरवर सक्रिय आहेत. प्रचारात ते कुठेही दिसत नाही. एवढेच नव्हे तर प्रचाराला अवघे काही दिवस उरले असताना ते मुंबईबाहेर जाऊन बसले आहेत.
तर दुसरीकडे तिकीटवाटपाच्या मुद्द्यावरून नाराज असलेल्या संजय निरूपम यांनी यापूर्वीच आपण प्रचार करणार नसल्याचे जाहीर केले होते. याशिवाय, लोकसभा निवडणुकीसाठी उभ्या राहिलेल्या प्रिया दत्त या पुन्हा एकदा दिसेनाशा झाल्या आहेत.
नेहमी चर्चेत असणाऱ्या या नेत्यांशिवाय संघटनात्मक पातळीवर कार्यरत असणाऱ्या नेत्यांचीही साधारण तीच गत आहे. यापूर्वी प्रसारमाध्यमांसमोर काँग्रेसची बाजू ताकदीने मांडणारे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष जनार्दन चांदूरकर यंदा कुठेच दिसत नाहीत. तर काँग्रेस पक्षाचा अल्पसंख्याक चेहरा म्हणून ओळखले जाणारे नसीम खान चांदिवली मतदारसंघात अडकून पडले आहेत. राहता राहिले मुंबई काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष एकनाथ गायकवाड. मात्र, मुंबईभर धावपळ करण्याचे त्यांचे वय नाही. जेवढी शक्ती आहे तेवढी धारावीमध्ये आपल्या लेकीच्या प्रचारात त्यांना खर्ची घालावी लागणार आहे.
ही सगळी परिस्थिती पाहता मुंबईत काँग्रेस पक्ष भाजपा-शिवसेनेसारख्या तगड्या विरोधकांसमोर तग कसा धरणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मात्र, आता राहुल गांधी मुंबईत येत आहेत. त्यावेळी एकमेकांचे तोंड न पाहणारे सर्व नेते व्यासपीठावर येतील. पण यानंतर हे नेते एकदिलाने काम करण्याची शक्यता फारच कमी आहे.
अशातच राहुल गांधी यांची सभा चांदिवली आणि धारावी मतदारसंघात ठेवली आहे. हे दोन्ही मतदारसंघ पूर्वीपासून काँग्रेसचे बालेकिल्ले आहेत. याऐवजी शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या पश्चिम उपनगर किंवा भाजपाचा वरचष्मा असलेल्या ईशान्य मुंबईत ही सभा झाली असती तर त्याचा कदाचित काँग्रेसला फायदा होऊ शकला असता. पण ही संधीही काँग्रेसने नेत्यांच्या कुरघोडीमुळे गमावली आहे.