वानखेडे स्टेडीयमकडे जाणारा पादचारी पूल बंद

 पुलाची दुरुस्ती होईपर्यंतर मरिन लाईन्स रेल्वे स्टेशनचा पादचारी पुल प्रवाशांसाठी खुला 

Updated: Apr 1, 2019, 08:39 PM IST
वानखेडे स्टेडीयमकडे जाणारा पादचारी पूल बंद title=

मुंबई : सीएसएमटी पूल दुर्घटनेनंतर पालिका प्रशासनाला जाग आली असून आता पुन्हा एकदा पूल ऑडीटचे काम जोरात सुरू झाले आहे. या पार्श्वभूमीवर वानखेडे स्टेडीयम गेट क्र. 4 कडे जाणारा पादचारी पूल बंद करण्यात आला आहे. हा पूल रहदारीसाठी धोकादायक असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे. हा पूल महर्षी कर्वे रोड आणि आनंदीलाल पोतदार मार्ग यांना जोडतो. त्यामुळे या ठिकाणचा हा महत्त्वाचा मार्ग मानला जातो. वानखेडे स्टेडीयम गेट क्र. 4 येथील धोकादायक पुलाची दुरुस्ती होईपर्यंतर मरिन लाईन्स रेल्वे स्टेशनचा पादचारी पुल प्रवाशांसाठी खुला राहणार आहे.

हा पूल शकुंतला कांतीलाल ईश्वरलाल जैन या शाळेजवळ असल्यानं येथून विद्यार्थी आणि पालकांची वर्दळ असते विशेषत: सकाळ आणि संध्याकाळच्या वेळेस इथे मोठ्या प्रमाणात रहदारी असते. सीएसएमटी पूल दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी पालिका सज्ज झाली आहे. वानखेडे स्टेडीयम गेट क्र. 4 कडे जाणारा पादचारी पूल धोकादायक असल्यानं मुंबई नागरिकांच्या येण्या-जाण्यासाठी हा पूल बंद करण्यात आल्याचे आवाहन पालिकेने केले आहे. 

सध्या सुरु असलेल्या आयपीएल मँचेस बघण्यासाठी येणारे प्रेक्षकही याच पुलाचा वापर करतात. त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती. पण इंजीनीअर्सनी केलेल्या ऑडीटमध्ये हा पूल धोकादायक आढळला आहे. त्यामुळे पालिका यंत्रणा सजग झाली आहे. या पुलाची दुरुस्ती होईपर्यंत हा पादचारी पूल बंद ठेवण्यात येणार असल्याचं महापालिकेकडून सांगण्यात आले आहे. सध्या मरिन लाईन्स रेल्वे स्टेशनच्या पर्यायी पादचारी पुलाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.