मुंबई : लोकसभा निवडणुक तोंडावर आली असताना राजकिय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. सत्ताधारी भाजपा चहुबाजुने घेरण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी सज्ज आहे. भाजपाने गेल्या निवडणुकीत दिलेले आश्वासन, रणनिती यावर ताशेरे ओढण्यात येत आहेत. 'चौकीदार चोर है' हे कॅम्पेन जोरात चालवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा नेते विनोद तावडे यांनी विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे.
चौकीदार चोर आहे, पळपुटा आहे असा आरोप माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केला होता. आदर्शमध्ये ज्यांनी एवढा दरोडा घातला तो चोर शब्द कसा उच्चारु शकतो याचं मला आश्चर्य वाटतं, असे विनोद तावडे म्हणाले. ज्यांनी चंद्रपुरला आपला उमेदवार बदलावा म्हणून ज्यांनी राजीनामा देतो असं म्हणणारा पळपुटा आहे की नाही ? असा प्रश्न तावडेंनी उपस्थित केला. ज्यांनी नांदेडला उमेदवारी बदलून वहिनींना उमेदवारी देण्याचा विचार केला तो पळपुटा नाही का ? अशा व्यक्तीच्या तोंडी पळपुटा शब्द शोभत नाही, असा टोला तावडेंनी लगावला.
मुख्यमंत्री म्हणजे गुळाच्या ढेपेला चिकटलेला मुंगळा असल्याचा आरोप राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ यांनी केला. भुजबळ यांच्यावरही तावडेंनी निशाणा साधला. ज्यावेळेस युतीचे सरकार घट्ट बहुमताचं असतं, जेव्हा सगळे मंत्री एकोप्यानं काम करतात. यांच्या पक्षात अजित पवार माझ्याविरोधात काय करतात, आर आर कोणाविरोधात काय करतात असा विचार करावा लागतो त्यांनाच असं सुचु शकतं असे तावडे म्हणाले.
धनंजय मुंडे वर्धाच्या गर्दीबाबत विनोद तावडेंनी यावेळी भाष्य केले. धनंजय मुंडेंच्या भाषणाचा आपण स्वतः व्हिडियो बघा, 44 डिग्री असतांना एक लाखाची सभा होणं सोप्पी गोष्ट नाही. पवार साहेबांबाबत जे काही मोदी बोलतायंत ते राष्ट्रवादीचे लोकं खासगीत बोलतायंत, असा टोला तावडेंनी लगावला आहे. ते जाऊद्यात, राष्ट्रीय नेते मोठ्या गोष्टी बोलतील आपण आपलं गल्लीतले बोलावं असे तावडे म्हणाले. राजू शेट्टीबाबतही यावेळी तावडेंनी भाष्य केले. नंबर दोनचे पुरावे द्या, नंबर दोनचे काम तुम्ही करत आहेत, बारामती विरोधात लढणारे आता त्यांच्या पायाशी गेले आहेत असा चिमटा यावेळी तावडेंनी राजू शेट्टींना काढला.