मंत्रीमंडळाच्या बैठकीत बत्ती गुल, मग राज्याचं काय बोलता?

राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना आज पुन्हा मंत्रालयात वीज पुरवठा खंडित झाला होता.  

Updated: May 26, 2022, 04:08 PM IST
मंत्रीमंडळाच्या बैठकीत बत्ती गुल, मग राज्याचं काय बोलता? title=

मुंबई : राज्यातील नागरिकांना लोड शेडिंगचा फटका बसता असताना आता राज्याचे मुख्यालय असलेल्या मंत्रालयालाही विजेने झटका दिलाय. राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना दोनदा वीज पुरवठा खंडित झाल्याच्या घटना एकाच महिन्यात घडल्या आहे. वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत संताप व्यक्त करण्यात आला.

ऐन उन्हाळ्यात राज्यातील नागरिकांना लोडशेडिंगचा त्रास सहन करावा लागत आहे. लोड शेडींगमुळे वीज उपलब्ध होत नसल्याने अंगातून धारा भळाभळा वहात आहेत. लहान मुले, वृद्ध नागरिकांना उन्हाच्या झळा सहन होत नाहीत. शेतात वेळेवर पाणी मिळत नसल्यामुळे शेते होरपळून निघत आहेत.

एकीकडे राज्यातील नागरिकांची अशी ससेहोलपट सुरु असताना आज पुन्हा राज्याच्या मुख्यालयातील वीज गायब झाली. यापूर्वीही १७ मे रोजी मंत्रालयात राज्य मंत्री मंडळाची बैठक झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑनलाईन माध्यमातून यांनी ही मंत्रिमंडळाची बैठक घेतली होती. ही बैठक सुरु असतानाच अचानक मंत्रालयातील वीज पुरवठा खंडित झाला होता. यामुळे मुख्यमंत्री आणि मंत्र्यांचा संपर्क तुटला होता.

उन्हाळ्याचे दिवस असताना वीज गायब झाल्याने एसी बंद पडल्याने मंत्री घामाघूम झाले होते. एक तास खंडित झालेला हा पुरवठा फक्त मंत्रालय आणि मंत्र्यांच्या बंगल्यातही खंडित झाला होता.

त्यानंतर आज पुन्हा एकदा वीज पुरवठा खंडित झाला. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वीच पुन्हा वीज पुरवठा खंडित झाल्याने मंत्रालयातील कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. बेस्टचे कर्मचारी वीज पुरवठा सुरू करण्यासाठी तातडीने मंत्रालयात दाखल झाले. सुमारे 40 मिनिटे मंत्रालयातील वीजप्रवाह खंडित झाला होता.