सावधान! तुमच्या मोबाईलमध्ये 'स्मार्ट' चोर, तुमचं बँक खातंही तो रिकामं करणार

स्मार्ट हॅकर्स स्मार्टफोनच्या आधारेच तुम्हाला स्मार्ट गंडा घालू शकतो, तेव्हा सावध व्हा

Updated: Aug 12, 2021, 10:14 PM IST
सावधान! तुमच्या मोबाईलमध्ये 'स्मार्ट' चोर, तुमचं बँक खातंही तो रिकामं करणार title=

प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई : अँड्रॉईड स्मार्ट फोन वापरणाऱ्यांसाठी ही धोक्याची रिंगटोन आहे. तुम्ही वापरत असलेल्या स्मार्टफोनमधील माहिती कुणीतरी दुसराच पाहतोय. तो तुमचं ट्विटर अकाऊंट हॅक करू शकतो. तुमचं फेसबुक अकाऊंट वापरू शकतो. तुमच्या बँकेचे पासवर्ड आणि आधार कार्ड वापरून तुमच्या बँक खात्यातून लाखो रुपये लुटू शकतो. 

हे सगळं शक्य आहे, कारण कुणीतरी तुमच्या मोबाईलमध्ये व्हायरस सोडलाय. VULTURE असं या व्हायरसचं नाव आहे.

हा व्हायरस मोबाईलमध्ये प्रवेश कसा करतो?

एखादी अनोळखी लिंक तुम्ही क्लिक केलीत की, हा व्हायरस मोबाईलमध्ये शिरतो. मग आपल्या मोबाईल फोनची स्क्रीन मिरर हॅकरला दिसते.
लॉग इन, पासवर्ड, इंटरनेट हिस्ट्री, बँक डिटेल्स असे सगळे तपशील मालवेअर रेकॉर्ड करतो. धक्कादायक बाब म्हणजे प्ले स्टोअरमधील प्रोटेक्शन गार्ड नावाचं अॅप डाऊनलोड केल्यावर हा मालवेअर अॅक्टिव्ह होतो. त्यामुळं मोबाईल सुरू ठेवायचा असेल तर आधी प्रोटेक्शन गार्ड अॅप अनइन्स्टॉल करा, असा सल्ला तज्ज्ञ देतात.

सध्याचं युग हे डिजिटल युग आहे. बिलं भरण्यापासून ते ई कॉमर्स साईटवर सामान विकत घेण्यापर्यंत सगळे व्यवहार आपण मोबाईल फोनमार्फत करतो. पण कुणीतरी स्मार्ट हॅकर्स या स्मार्टफोनच्या आधारेच तुम्हाला स्मार्ट गंडा घालू शकतो. तेव्हा सावध व्हा. आणि पूर्ण माहिती घेतल्याशिवाय कुठलंही ऍप डाऊनलोड करू नका. मोबाईलला चांगल्या अँटी व्हायरसचं संरक्षण द्या.