मुंबई : मुंबईसह राज्यभरात कोरोना रुग्ण संख्येत वाढ होतेय. सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवासाला सुरुवात झाल्यानंतर नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन झाल्याचे दिसून आले. मास्क घालणं, सोशल डिस्टन्स पाळणं असा कोणताही प्रकार नागरिकांनी पाळलेला दिसला नाही. याचा परिणाम हा कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येत दिसून येतोय. याची महापालिका प्रशासनाने गंभीर दखल घेतलीय. मुंबईकरांसाठी पुढील 10 दिवस अतिशय महत्त्वाचे असणार आहेत.
मुंबई महानगर पालिकेतर्फे पुढील १० दिवस मुंबईच्या कोरोना स्थितीचा मनपाकडून आढावा घेतला जाणार आहे. बेफिकिरीमुळे रूग्ण वाढले तर गंभीर पावलं उचलण्याचा इशारा मनपाने दिलाय. मनपा अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी याबद्दल माहिती दिली.
मुंबईतील 4 वॉर्डमध्ये झपाट्यानं कोरोना वाढतोय. चेंबुर, टिळक नगर, बोरिवली, मुलुंड, अंधेरी याठिकाणी रुग्णसंख्या वाढल्याचं दिसून येतंय. रुग्णसंख्येत दररोज 10 ते 15 टक्के वाढ होताना दिसतेय.
चेंबुर, टिळक नगर आणि मुलुंड भागात रुग्णसंख्या वाढीचा दर सर्वाधिक 0.26% एवढा आहे. 98% रुग्णसंख्या वाढीच्या केसेस इमारतींच्या भागातून येतायत. त्यामुळेच नियमांच्या कठोर अंमलबजावणीसाठी मुंबई महापालिकेच्या निवासी इमारतींना नोटीस पाठवण्यात आल्यायत.
मुलुंडमध्ये सर्वाधिक 170 इमारती सील करण्यात आल्यायत. तर एम वेस्ट वॉर्डमध्ये जवळपास 550 इमारतींना नोटिसा देण्यात आल्यायत. इमारतींमध्ये बाहेरुन येणा-या व्यक्तींचं स्क्रीनिंग करण्याबाबत तसंच कमीत कमी लोकांना प्रवेश देण्याच्या सूचनाही देण्यात आल्यायत.
तसंच सार्वजनिक ठिकाणं, विवाह कार्यालयं, बाजारपेठांच्या जागा याठिकाणीही कडक नियमांची अंमलबजावणी करण्यात येतेय. मुंबईत सध्या सक्रिय कंटेंटमेंट झोनची संख्या 76 एवढी आहे.