मुंबई : भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या दोघांच्या भेटीमुळे चर्चांना उधाण झाले आहे. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी वर्षा येथे दोघांमध्ये अर्ध्या तास चर्चा झाली. मराठा आरक्षणाच्या विषयासह इतर विषयांवरही दोघांत चर्चा झाली आहे. उदयनराजे यांनी यापूर्वी मराठा आरक्षण प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती.
महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षाचे मिळून हे सरकार आहे. या तीन पक्षांच्या सरकारला मार्गदर्शन करण्याचं काम शरद पवार करत आहे. यामुळे आपण मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर शरद पवारांची भेट घेतली, असं उदयनराजे म्हणाले.
उदयनराजे भोसले गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्यातील प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी घेताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी दिल्लीत शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर उदयनराजे भोसले यांनी प्रसारमाध्यमांशी संवादही साधला होता. तेव्हा शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षाही उदयनराजे यांनी व्यक्त केली होती.