मुंबई : पहिल्याच पावसात पूर्व उपनगरात सखल भागात पाणी साचलेलं पाहायला मिळालं. चेंबूर-सांताक्रूझ लिंक रोडवर पोलीस स्थानकाच्या बाजूला रस्त्यावर पाणीच पाणी दिसतयं. त्यामुळे वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. तर मुंबईत सकाळपासून सुरू असलेल्या पावसाचा पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झालाय. पश्चिम आणि मध्य रेल्वे पंधरा ते वीस मिनिटे उशिरा धावत आहे. ठाणे रेल्वे स्थानकात पाणी भरायला सुरूवात झालीय.
मध्य रेल्वेची वाहतूक आज पुन्हा विस्कळीत झाली. पावसाचा फटका बसला.. कसाऱ्याकडे जाणारी रेल्वेसेवा रखडली आहे. आसनगाव ते खर्डी स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वेच्या जलद मार्गावरील वाहतूक ३० मिनिटे उशिराने सुरू आहे. तर धीम्या मार्गावरील वाहतूक २० मिनिट उशिराने सुरू आहे. मुंबई आणि परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पावसाचा फटका हा तिन्ही मार्गावरील लोकलसेवेला देखील बसला आहे. हार्बर मार्गावरील वाहतूक पंधरा मिनिटे उशिराने सुरू आहे.
मुंबईतील पावसामुळे नागरिकांसह आमदारांचे हाल होत असल्याचा मुद्दा विधानसभेत काँग्रेस आमदार अमीन पटेल यांनी मांडला. पहिल्याच पावसामुळे नागरिक वाहतूक कोंडीने त्रस्त झाल्याचा मुद्दा पटेल यांनी मांडला. नालेसफाई न झाल्यामुळे मुंबई शहर आणि उपनगरात अनेक भागात पाणी साचल्यामुळे वाहतूक कोंडी झाल्याचं पटेल म्हणाले. मेट्रोच्या कामांमुळे वाहतूक कोंडी वाढल्याचं पटेल यांनी निदर्शनास आणलं. मुख्यमंत्र्यांनी आज मुंबई महापालिका आयुक्तांना तातडीने बोलावून याबाबत बैठक घेण्याची केली मागणी त्यांनी केली.
मुंबईसह ठाणे, कल्याण, वसईत पावसाने दमदार हजेरी लावली. सकाळपासूनच पावसाने जोर धरलाय. अर्ध्याहून अधिक जून महिना सरल्यानंतर अखेर महिनाअखेरीस पावसाला सुरुवात झाली आहे. धरण क्षेत्रातही पावसाची संततधार सुरु आहे. दरम्यान, रायगड जिल्ह्यात सर्वत्र दमदार पाऊस झालाय. अलिबागमध्ये मात्र किरकोळ सरी झाल्या. महाड, पोलादपूर, माणगाव, श्रीवर्धन, मुरूड, पेण, रोहा या तालुक्यात पावसाचा जोर आहे. पावसाच्या आगमनामुळे शेतकरी वर्ग सुखावला आहे. उकाड्यान हैराण नागरिकांनाही दिलासा मिळालाय. पावसामुळे महामार्गावरील वाहतूक मंदावली आहे.