छेडछाडीतून मुलींच्या आत्महत्या, राज्य शासनाचे कठोर चौकशीचे निर्देश

औरंगाबाद आणि बारामती छेडछाडीतून मुलींच्या आत्महत्या प्रकरणाची गृहराज्यमंत्र्यांनी  दखल घेतलीय.  

Updated: Aug 23, 2018, 06:47 PM IST
छेडछाडीतून मुलींच्या आत्महत्या, राज्य शासनाचे कठोर चौकशीचे निर्देश  title=

मुंबई : औरंगाबाद आणि बारामती छेडछाडीतून मुलींच्या आत्महत्या प्रकरणाची गृहराज्यमंत्र्यांनी  दखल घेतलीय.  झी २४तासच्या बातमीनंतर दीपक केसरकर यांनी संबंधित पोलिस अधीक्षकांना कठोर चौकशीचे निर्देश दिलेत. सर्व प्रकरणाची दखल घेऊन कारवाई करण्याचे आदेश गृहराज्यमंत्र्यांनी दिले आहेत. तपास करण्यास पोलीस टाळाटाळ करत असतील तर संबंधित पोलिसांवर कारवाई करा असे आदेश पोलीस अधीक्षकांना दिल्याची माहिती केसरकर यांनी झी २४ तासला दिलीय. 

औरंगाबाद जिल्ह्यातल्या कन्नड तालूक्यातील तांदूळवाडीत १७वर्षीय तरुणीने गावातील मुलांच्या त्रासाला कंटाळून गळफास घेतलाय.  गावगुंड फोन करून नेहमी तिला त्रास देते होते असा कुटुंबियांचा आरोप आहे.  पीडित तरुणीने चार दिवसापूर्वी विष पिऊन आत्महत्या करण्याच्या प्रयत्न केला होता. मात्र वेळीच उपचार मिळाल्याने तिचा जीव वाचला होता. मात्र त्यानंतर तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. 

तर दुसरीकडे बारामती तालुक्यातील सोनगाव येथील अकरावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीनं गावातील मुलाच्या छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केलीय. बारामती येथील विद्याप्रतिष्ठान विद्यालयात शिक्षण घेत असलेल्या पीडित मुलीनं ११ ऑगस्टला विष प्राशन केलं होतं. त्यानंतर तिला बारामतीतील खासगी दवाखान्यात उपचार सुरू होते. तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.  गेल्या अनेक दिवसांपासून गावातील मुलगा तिला त्रास देत असल्याची फिर्याद पीडित मुलीनं पोलीस ठाण्यात दिली.