Thane News : जीवनात प्रत्येकाची काही ना काही स्वप्न असतात. काही संकल्प असतात. त्यांच्या पूर्ततेसाठीचे प्रयत्नही सुरु होतात. ठाण्याच्या सचिन लोहारनंही असाच ध्यास घेतला आणि समोर येणाऱ्या प्रत्येक आव्हानावर त्यानं मात केली. असं करता करता जिद्द आणि चिकाटीच्या बळावर त्यानं तब्बल 2100 किमीचं अंतर धावून ओलांडलं.
ठाणे ते नरिमन पॉईंट असा नोकरीच्या निमित्तानं होणारा दिवसभरातील चार तासांचा प्रवास, कौटुंहबीक जबाबदारी, थकवा, पाऊस, ऊन्हाचा मारा अशा सर्व अडचणींवर मात करत त्यानं 100 दिवसांत हा संकल्प सिद्धीस नेला. धावण्याप्रती असणारी आवड पाहता सचिननं केलेली ही किमया अनेक क्रीडापटू आणि त्यातूनही धावपटूंसाठी प्रेरणाच आहे.
29 एप्रिल 2023 ला सूर्योदयाच्याच क्षणी धावण्याच्या 100 दिवसांसाठीच्या निर्णयासाठी मी पहिलं पाऊस ठेवलं, असं सचिन म्हणतो. शंभर दिवसांचा हा पल्ला मोठा वाटत होता. पण, पहिल्याच दिवशी मिळालेल्या आंदाखातर त्यानं सर्व 100 दिवसांसाठी दर दिवशी 21 किमी अंतर धावण्याचं ठरवलं. 'ठाण्याच्या उकाड्यात हे विधारक स्वप्न मला खाली खेचत होतं. माझ्या शरीराने अनेक प्रसंगी हार मानली पण मजबूत मन नेहमी न थांबता ठामपणे खंबीरपणे उभा राहिलो आणि त्यावर उपाय शोधले', असं सांगत त्यानं आव्हानांवर मात करण्याचा मार्ग दाखवला.
बऱ्याचदा शरीरानंही हात टेकले पण, इच्छाशक्तीच्या बळावर सचिननं हे यश संपादन केलं. आपण आज जे काही केलं आहे ते इतर कोणीही केलेलं नाही याचा कमाल आनंद त्याला आहे. 2020 आणि 2021 मध्येही त्यानं हे लक्ष्य साध्य करण्याचा प्रयत्न केला होता. पण, अनुक्रमे 1600 आणि 700 किमी अंतर ओलांडल्यामुळं तो अपयशी ठरला. अखेर 2023 मध्ये दर दिवशी 21 किमी अंतर धावण्याचा त्याचा मानस पूर्ण झाला आणि तब्बल 100 दिवस त्यानं हे चक्र सुरुच ठेवलं. इच्छाशक्तीच्या बळावर सचिन लोहार याला मिळालेलं हे यश सध्या ठाणेकरांमध्ये चर्चेचा विषय ठरत असून, त्याचं अनेकजण कौतुक करत आहेत.