ठाकरे विरुद्ध ठाकरे ! मुंबईतली युवाशक्ती कोणाच्या बाजूने? आदित्य-अमित आमने सामने

Thackere vs Thackeray : मुंबईतले तरुण कुणाच्या बाजूनं आहेत, याचा कौल पुढच्या महिन्यात मिळणार आहे. मुंबईत पुढच्या महिन्यात आदित्य ठाकरे विरुद्ध अमित ठाकरे असा धुरळा उडणार आहे. शिंदे यांच्या बंडानंतरची ही पहिलीच सिनेट निवडणूक आहे. 

देवेंद्र कोल्हटकर | Updated: Aug 11, 2023, 08:18 PM IST
ठाकरे विरुद्ध ठाकरे ! मुंबईतली युवाशक्ती कोणाच्या बाजूने? आदित्य-अमित आमने सामने title=

देवेंद्र कोल्हटकर झी मीडिया, मुंबई :  ठाकरे विरुद्ध ठाकरे (Thackeray vs Thackeray) लढाई रंगणार आहे मुंबई विद्यापीठात (Mumbai University). युवाशक्ती आपापल्या बाजूनं खेचण्यासाठी आदित्य (Aditya Thackeray) आणि अमित  (Amit Thackeray) जोरदार षड्डू ठोकणार आहेत. मुंबई विद्यापीठात सिनेट निवडणुकीचा (Senate Election) धुरळा 10 सप्टेंबरला उडणार आहे. या निवडणुकीसाठी आदित्य आणि अमित दोन्ही युवा नेते सर्वशक्तिनिशी मैदानात उतरणार आहेत. आतापर्यंत मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद पाहायला मिळालीय. मात्र शिंदेंच्या बंडानंतर ही पहिली सिनेट निवडणूक आहे, त्यामुळे समीकरणं बदललीयत. 

आदित्य ठाकरे राजकारणात उतरले तेव्हापासून मुंबई विद्यापीठावर युवासेनेचं वर्चस्व राहिलंय. गेल्या सिनेट निवडणुकीमध्ये 10 पैकी  10 जागा आदित्य ठाकरेंनी जिंकल्या होत्या. युवा नेतृत्व म्हणून आदित्यनं मुंबई विद्यापीठात ताकद मिळवलीय. तर दुसरीकडे अमित ठाकरेंना राजकारणात छाप पाडण्यासाठी मुंबईत विद्यापीठाची निवडणूक निर्णायक आहे. अमित ठाकरे शिंदे आणि भाजपच्या साथीनं निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. शिंदे गट आणि भाजप हे या निवडणूकीत जोर लावणार असल्याची चर्चा आहे 
यात आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाने देखील भर पडली आहे. आगामी काळात राजकारणात पाय रोवून उभं राहायचं असेल तर सिनेट निवडणुकीत ताकद दाखवणं अमितसाठी गरजेचं आहे. 

सिनेट निवडणुकीचा कार्यक्रम
मुंबई विद्यापीठांच्या एकूण 10 जागांसाठी ही सिनेट निवडणूक होणार आहे. 10 सप्टेंबरला निवडणूक पार पडेल. सिनेट निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 18 ऑगस्ट संध्याकाळी पाच वाजेपर्यंत असणार आहेत. तर उमेदवारी अर्जाची छाननी प्रक्रिया 21 ऑगस्ट सकाळी 11 वाजेपर्यंत होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत ही 25 ऑगस्ट संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ठेवण्यात आली आहे.  28 ऑगस्ट रोजी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येणार आहे. 10 सप्टेंबर रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सिनेट निवडणुकीसाठी मतदान करण्यात येणार असून 13 सप्टेंबर रोजी या निवडणुकांचा निकाल जाहीर केला जाणार आहे. 

युवासेनेला काही सदस्यांनी केलेला रामराम आणि समोर मनसे, शिंदे, भाजप युतीचं आव्हान यामुळे आदित्य ठाकरेंसाठी सिनेट निवडणूक तेवढी सोपी राहिलेली नाही. सिनेट निवडणुकीवर ज्याची सत्ता त्याच्याबरोबर मुंबईतली युवाशक्ती असं समीकरण आहे. पुढचं वर्ष निवडणुकांचं आहे. त्यामुळे या रंगतदार निवडणुकीत कुठले ठाकरे गुलाल उधळणार याकडे तरुणांबरोबरच राजकीय वर्तुळाचंही लक्ष आहे.