संजय राठोड यांच्यावर कारवाई करा, अन्यथा शक्ती समितीमधून भाजप बाहेर पडणार - फडणवीस

पुरावे असूनही मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्यावर कारवाई का नाही, असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी  केला आहे.

Updated: Feb 28, 2021, 02:13 PM IST
संजय राठोड यांच्यावर कारवाई करा, अन्यथा शक्ती समितीमधून भाजप बाहेर पडणार - फडणवीस  title=
संग्रहित छाया

मुंबई : पुरावे असूनही मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्यावर कारवाई का नाही, असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी करत महिलांवरच्या अत्याचारांमध्ये (Women's Atrocities) मंत्रीच आघाडीवर असतील तर शक्ती समितीमधून भाजप (BJP) सदस्य बाहेर पडण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला. महिलांवरील अत्याचारात सरकारमधील मंत्रीच सहभागी असतील तर काय म्हणायचे? पोलीस (Police)  साधी तक्रार नोंदवत नाहीत, अशा पोलीस अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित केले पाहिजे, असे फडणवीस यांनी म्हटले. (Take action against Sanjay Rathore, otherwise BJP will leave Shakti Samiti -Devendra Fadnavis)

वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा आला नाही तर शक्ती कायद्यामधल्या संयुक्त समितीमधून भाजपचे आमदार बाहेर पडतील, असा इशारा देताना राठोड यांच्या विरोधात पुरावे असताना राजीनामा का नाही, असा सवालही फडणवीसांनी केला. महिला अत्याचारांमध्ये राज्याचे मंत्रीच आघाडीवर असल्याचा घणाघातही त्यांनी केला. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

आघाडी सरकारवर हल्लाबोल

यावेळी फडणवीस यांनी आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. तथाकथित अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्या सुरु होत आहे. इतिहासातील सर्वात कमी कालावधीचे अर्थसंकल्पीय हे अधिवेशन आहे. राज्याची परिस्थिती बिकट आहे, असं असताना कमी कालावधीचे अधिवेशन हे सरकार घेत आहे. लक्षवेधी नाही, प्रश्नोत्तरे नाही असं हे अधिवेशन आहे. अधिवेशन न चालवणे हे एकमेव धोरण या सरकारचे दिसत आहे. तीन पाटाचे हे सरकार आहे, कोण कोणाचे पाट ओढत आहे हे समजत नाही अशी सरकारची अवस्था आहे.

सरकारच्या माध्यमातून मोगलाई

एकमेव सरकारमध्ये काम चालू आहे ते म्हणजे बदल्या. बदल्याबाबत बोली लागत आहे, IAS - IPS च्या बदल्यात भ्रष्टाचार होत आहे. शेतकऱ्यांच्या वाईट अवस्थेबद्दल आम्ही आवाज उठवणार आहोत. वीज बिलाचे संकट हे ओढवले आहे
वीज बिलाचे सक्तवसुली संचालनालय सुरू झाले आहे. मोगलाई ही सरकारच्या माध्यमातून पाहायला मिळते. राज्यातील कायदा सुव्यवस्थाबद्दल तर बोलायलाच नको. रेती उपशासाठी अवैध घाट बोली लावून चालवण्याचे काम सरकारशी  संबंधित लोकं करत आहेत.

महिला अत्याचारा मंत्रीच आघाडीवर 

पोलिसांची लाचार अवस्था अशी अवस्था याआधी कधी बघितली नाही. पुण्याचे PA यांना तात्काळ निलंबित केलं पाहिजे.संजय राठोड यांना दोष देणार नाही कारण त्यांना वरिष्ठांचा पाठींबा आहे. कारण एवढे ढळढळीत पुरावे असूनसुद्धा कारवाई होत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते याच्यावर FIR दाखल असून सुद्धा कारवाई होत नाही.

 महिलांवर अत्याचार होत आहे. मात्र सरकार गप्प आहे. शक्ती कायदा हा फार्स आहे. जर संजय राठोड यांचा राजीनामा आला नाही तर शक्ती कायद्यातील संयुक्त समितीमधून भाजपचे आमदार राजीनामा देतील बाहेर पडतील. बाळासाहेंबांचे सुपूत्र सावरकर जयंतीना आदरांजली वाहात नाही ही सत्तेची लाचारी आहे. मुख्यमंत्री यांना नको असला तरी फुकटचा सल्ला देतो, सत्ता येत आणि जाते, काँग्रेसच्या नादी लागून सावरकर यांना अपमानित करू नका.