मुंबई : भाजप खासदार उदयनराजे भोसले (Udayan Raje Bhosale) यांनी सर्वपक्षातील नेत्यांच्या भेटीगाठी सुरु केल्या आहेत. दिल्लीत स्वपक्षातील नेत्यांच्या भेटी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेत चर्चा केली. त्यानंतर आज त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray) यांची त्यांच्या 'कृष्णकुंज' या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे. (Udayan Raje Bhosale met Raj Thackeray in mumbai)
दरम्यान, मराठा आरक्षणाबाबत उदयनराजे भोसले यांनी राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. आज मराठी भाषा दिनी उदयनराजे भोसले यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्याने या भेटीकडे विशेष लक्ष लागले होते. दरम्यान, या भेटीबाबत उदयनराजे भोसले यांनी स्पष्टीकरण दिले आहे. याआधी उदयनराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतली आहे.
लोकप्रतिनिधींनी जपून वागलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया खासदार उदयनराजे यांनी दिली आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची कृष्णकुंज वर भेट घेतली. घरातल्या लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी ही भेट झाल्याचे उदयनराजे यांनी सांगितले. संजय राठोड यांना पाठीशी घातले जातंय का, असा प्रश्न उदयनराजे यांना विचारलं असता, कुणीही चुकले तर त्याला शिक्षा व्हायलाच हवी, असे उदयनराजे म्हणालेत.