रविवारी घराबाहेर पडण्याआधी विचार करा! मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर सकाळपासून मेगाब्लॉक

रविवारी मध्य आणि पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे जर फार महत्त्वाचं काम नसेल तर घराबाहेर पडू नका. अन्यथा तुम्हाला ताटकळत राहावं लागू शकतं.   

शिवराज यादव | Updated: Dec 16, 2023, 04:27 PM IST
रविवारी घराबाहेर पडण्याआधी विचार करा! मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर सकाळपासून मेगाब्लॉक title=

रविवारी मित्रांना भेटण्यासाठी किंवा फिरण्यासाठी घराबाहेर पडण्याआधी ही बातमी नक्की वाचा. जर तुमचं काम फार महत्त्वाचं नसेल तर घराबाहेर पडू नका. कारण उद्या (17 डिसेंबर)मध्य आणि पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी हा नियमित ब्लॉक घेण्यात येणार आहे. ऐन प्रवासाच्या वेळी हा ब्लॉक घेतला जाणार असल्याने तुम्हाला उगाच ताटकळत राहावं लागू शकतं. 

मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याणदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. तर पश्चिम रेल्वेवर माहीम ते सांताक्रुझ अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक घेतला जाईल. दरम्यान हार्बर मार्गावर कोणताही ब्लॉक नसणार आहे.  सीएसएमटी ते पनवेलदरम्यान आणि ट्रान्सहार्बर मार्गावर ठाणे ते पनवेल दरम्यान तुम्ही निर्धास्तपणे प्रवास करु शकता 

मध्ये रेल्वेवर काय स्थिती असणार आहे?

- ठाणे ते कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावर रविवारी सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंत ब्लॉक घेतला जाणार आहे. यादरम्यान सीएसएमटी डाऊन जलद लोकल ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान त्यांच्या संबंधित थांब्यांव्यतिरिक्त कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांदरम्यान डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. 

- कल्याण येथून सुटणाऱ्या अप जलद लोकल कल्याण ते ठाणे स्थानकांदरम्यान दिवा, मुंब्रा आणि कळवा स्थानकांदरम्यान त्यांच्या संबंधित थांब्यांव्यतिरिक्त अप धिम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि मुलुंडपुढे अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. 

- सीएसएमटी/दादरहून सुटणाऱ्या डाऊन मेल/एक्स्प्रेस ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान पाचव्या मार्गावर वळवण्यात येतील. 

- सीएसएमटी/दादरला येणाऱ्या अप मेल/एक्स्प्रेस कल्याण ते ठाणे/विक्रोळी स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गावर वळवण्यात येतील.

पश्चिम रेल्वेवर काय स्थिती असेल?

- पश्चिम रेल्वेवर माहीम ते सांताक्रुझ अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत हा ब्लॉक घेतला जाईल. 

- या काळात सर्व जलद मार्गावरील लोकल माहीम आणि सांताक्रुझ/अंधेरी स्थानकांदरम्यान धिम्या मार्गावर चालविल्या जातील. ब्लॉक दरम्यान काही लोकल रद्द राहतील. 

- बोरिवली आणि अंधेरीतील काही लोकल हार्बर मार्गावर गोरेगावपर्यंत चालविल्या जातील.