'मेगाभरती चूकच', पाटीलांच्या 'या' वक्तव्यावर सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया

मेगाभरती करताना जुन्यांचा अपमान आणि नव्यांचा सन्मान होऊ नये 

Updated: Jan 18, 2020, 10:53 AM IST
'मेगाभरती चूकच', पाटीलांच्या 'या' वक्तव्यावर सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया  title=

मुंबई : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या अगोदर भाजप पक्षात केलेली 'मेगाभरती ही चूकच' अशी कबुली भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पिंपरी-चिंचवडच्या मेळाव्यात दिली आहे. यावर भाजपचे वरिष्ठ नेता सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  महत्वाचं म्हणजे यावर सुधीर मुनगंटीवारांनी अतिशय संतुलित प्रतिक्रिया दिली आहे. 

चंद्रकांत पाटील काय बोलले याची माहिती नसल्याचे प्रतिपादन त्यांनी सर्वात प्रथम केले. मात्र मेगाभरती राजकीय पक्ष वाढीसाठी आवश्यक असल्याचे मत देखील मुनगंटीवार यांनी व्यक्त केले. मात्र नवीन मेगाभरती करताना जुन्यांचा अपमान आणि नव्यांचा सन्मान होऊ नये अशी भूमिका देखील यांनी यावेळी मांडली.  नवी भरती भाजपच्या देशभक्ती धोरणाला-समाजहित नीतीला धरून असली तर पक्षाला बळकटी मिळते. तसेच पक्ष खाजगी मालमत्ता होऊ नये. काहींकडेच शेअर्स असू नयेत असेही मत मांडायला सुधीर मुनगंटीवार विसरले नाहीत. 

काँग्रेस, राष्ट्रवादीला खिंडार पाडून या पक्षातील अनेक दिग्गज नेत्यांना भाजपाने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या आधी आपल्या पक्षात प्रवेश दिला. यावेळी या बाहेरील नेत्यांचं स्वागत करताना पक्षाच्या पहिल्या फळीतील नेत्यांमध्ये उत्साह होता. याचं कारण म्हणजे विरोधी पक्ष आता संपणारच असे चित्र त्यावेळी निर्माण झालं होतं आणि दुसरं म्हणजे आता काँग्रेस, राष्ट्रवादीतील हे दिग्गज नेते आल्याने पक्ष जास्त जागा जिंकून पुन्हा सत्तेवर येईल असा विश्वास या नेत्यांना होता. मात्र त्याचवेळी या मेगाभरतीमुळे पक्षातील काही जण नाराज होते. ज्यांची संधी या मेगाभरतीमुळे हिरावली गेली किंवा ज्यांना ही मेगाभरती पटत नव्हती ते नेते नाराजी व्यक्त करत होते. मात्र उघडपणे कुणीही बोलायला तयार नव्हतं.

भाजपा सत्तेपासून दूर राहिल्यानं आता ही नाराजी समोर येत आहे असं म्हणावं लागेल. मेगाभरतीचे सर्व निर्णय तेव्हा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी घेतले होते. आता मात्र मेगाभरती चूकच होती असं सांगून चंद्रकांत पाटील यांनी तेव्हाच्या फडणवीस यांच्या धोरणावरच प्रश्नचिन्हं लावलं असल्याचं बोललं जात आहे.