'रक्षाबंधन साजरा करताना आईसमान बोलीभाषाही जगवा'(व्हिडीओ)

 'रक्षाबंधन साजरा करताना आईसमान बोलीभाषेचा विसर पडू देऊ नका' 

Updated: Aug 5, 2019, 11:17 PM IST

मुंबई : सध्या बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या राख्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत. आपल्या भावाला नेमकी कोणती राखी आवडेल ? मागच्या वर्षी कोणती राखी होती ? सध्या कोणत्या राख्यांचा ट्रेंड आहे ? असा विचार सध्या बहीणी करत आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील श्रीरंग संस्था बोलीभाषेचे महत्त्व पटवणाऱ्या राख्यांबद्दल जनजागृती करत आहे. 

आजच्या 'ब्रो' आणि 'सिस'च्या जमान्यात माई, आक्का, भावड्या, भाऊराया, दिद्या, दादूस, दाद्या असं म्हणणं हक्काचं, आपुलकीच वाटतं. मराठी भाषेत कितीही इंग्रजी शब्द मिसळले तरीही आपल्या बोलीतले हे शब्द नात्यात जीव ओततात. त्यामुळे या शब्दांवर आधारित राख्यांचा प्रचार श्रीरंग संस्थेतर्फे केला जात आहे.  रक्षाबंधन साजरा करताना आपल्या आईसमान असलेली बोलीभाषा देखील जगवा असे या निमित्ताने श्रीरंग संस्थेतर्फे करण्यात येत आहे. 

या संकल्पनेवर आधारित एक व्हिडीओ बनवण्यात आला असून हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात चर्चेचा विषय बनला आहे. पोलीस, कामगार, रुग्णांच्या हातात बोलीभाषेचा प्रचार करणारी राखी बांधून रक्षाबंधन साजरा केला जात आहे.

कलादिग्दर्शक सुमित पाटील यांची ही संकल्पना असून आवाजाचे जादूगार उदय सबनीस यांचा आवाज या व्हिडीओत ऐकायला मिळतोय. अमित कोकाटेने यासाठी कॅलिग्राफी केली असून प्रथमेश अवसरे, रोहन तिपे आणि आरती कड्वाडकर यांनी या व्हिडीओमध्ये कॅमेराची तर सौरभ नाईक यांनी एडीटींगची जबाबदारी संभाळली आहे. 'रक्षाबंधन साजरा करताना बोलीभाषेचा विसर पडू देऊ नका' हा व्हिडीओ बनवण्यामागचा हेतू असल्याचे संस्थेचे संस्थापक सुमित पाटील सांगतात.