मुख्यमंत्रीपदाच्या पालखीत शिवसैनिकाला बसवणार- उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे यांनी घेतली आमदारांची बैठक

Updated: Nov 10, 2019, 03:13 PM IST
मुख्यमंत्रीपदाच्या पालखीत शिवसैनिकाला बसवणार- उद्धव ठाकरे title=

मुंबई : शिवसेना सत्तास्थापन करणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या पालखीत शिवसैनिक बसवणार असं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरे यांची आमदारांसोबतची बैठक मुंबईत पार पडली. त्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. आतापर्यंत आपण पालखीचे भोई होतो. आता यापुढे आपण पालखीचे भोई होणार नाही. तर आता मी त्याच पालखीत शिवसैनिकाला बसवल्याशिवाय राहणार नाही. अशी आक्रमक भूमिका उद्धव ठाकरे यांनी आमदारांच्या बैठकीत मांडली आहे. 

शिवसेना सत्तास्थापनेसाठी राष्ट्रवादीसमोर प्रस्ताव ठेवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आता नवं समीकरण जुळताना दिसणार आहे. शिवसेना-भाजपमधील दरी वाढल्यामुळे युती तुटण्याच्या मार्गावर आहे. भाजप मुख्यमंत्रीपद सोडायला तयार नाही. तर शिवसेना मुख्यमंत्रीपदावर ठाम आहे. त्यामुळे सत्तासंघर्ष शिघेला पोहोचला आहे. पण आता शिवसेनेने नवा पर्याय शोधल्याचं दिसतं आहे.

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावं अशी शिवसैनिकांची इच्छा आहे, असे बॅनर मुंबईत झळकले आहेत. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री होण्याची संधी असल्याची शिवसैनिकांची भावना आहे. शिवसेनेच्या गोटात त्यामुळे सध्या वेगवान हालचाली घडत आहेत. शिवसेना आमदारांची द रिट्रीट हॉटेलवर बैठक घेत उद्धव ठाकरेंनी भूमिका मांडली.