'आशिष शेलार म्हणजे राजकीय मार्केट संपलेला माणूस'

शेलार यांच्या नौटंकीचे दिवस आता संपले आहेत. 

Updated: Nov 15, 2019, 05:15 PM IST
'आशिष शेलार म्हणजे राजकीय मार्केट संपलेला माणूस' title=

मुंबई: राज्यातील सत्तास्थापनेवरून झालेल्या संघर्षानंतर शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांमध्ये पुन्हा एकदा वितुष्ट निर्माण झाले आहे. त्यामुळे सध्या दोन्ही बाजूचे नेते एकमेकांवर चिखलफेक करताना दिसत आहेत. भाजपचे नेते आशिष शेलार यांनी आज शिवसेना खासदार संजय राऊत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना खोचक टिप्पणी केली होती. संजय राऊत यांनी वयाप्रमाणे परिपक्व विचार व्यक्त करावे, असे त्यांनी म्हटले होते. 

संजय राऊतांच्या वाढत्या वयाप्रमाणे परिपक्वताही वाढावी - शेलार

या टीकेला खासदार विनायक राऊत यांनी सणसणीत प्रत्युत्तर दिले आहे. आशिष शेलार म्हणजे राजकीय मार्केट संपलेला माणूस आहे. त्यामुळे त्यांच्या विधानाची दखल घेण्याची गरज नाही. शिवसेना त्यांना कोणतीही किंमत देत नाही. शेलार यांच्या नौटंकीचे दिवस आता संपले आहेत, अशा शब्दांत विनायक राऊत यांनी हल्ला चढवला. 

पालिकेला 'खड्डे दाखवत' मुंबईकरांची बक्कळ कमाई, पण...

संजय राऊत रुग्णालयात असताना आशिष शेलार यांनी त्यांची भेट घेतली होती. मात्र, आज त्यांनी राऊतांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना खोचक शेरेबाजी केली होती. माणसांचे वय वाढते तसे त्याची परिपक्वता वाढते तशी राऊतांचीही परिपक्वता वाढावी. नरेंद्र मोदी आणि अमित शहा समजायला राऊत यांना २५ वर्षे लागतील, असे आशिष शेलार यांनी म्हटले होते. 

भाजपने मुख्यमंत्रीपद अडीच-अडीच वर्ष वाटून घेण्याची मागणी नाकारल्यामुळे शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला होता. यामुळे युतीला बहुमत मिळूनही राज्यात सरकार स्थापन होऊ शकले नव्हते. सध्या शिवसेनेकडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सत्तास्थापनेची बोलणी सुरु आहेत. यासाठी शिवसेनेने केंद्रातील भाजप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीलाही (एनडीए) सोडचिठ्ठी दिली होती.