मुंबई: राज्यात ११९ आमदार असलेल्या भाजपचंच सरकार येईल, असा दावा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडून करण्यात आला. ते शुक्रवारी मुंबईतील पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, कडबोळ सरकार राज्याचं भलं करू शकत नाही. राज्यात आमच्याशिवाय कोणीही स्थिर सरकार देऊ शकत नाही. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा भाजपचेच नेतृत्त्व असलेले सरकार स्थापन होईल, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
'मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, हेच त्यांच्या डोक्यात' - शरद पवार
सध्या मुंबईत भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांची तीन दिवसीय बैठक सुरु आहे. या बैठकीत आमदारांसमोर विधानसभा निवडणुकीच्या समीक्षेचा अहवाल आमदारांसमोर मांडण्यात आला. यामध्ये सर्व ठिकाणी भाजपच नंबर एकचा पक्ष असल्याचे दिसून आले. भाजपला निवडणुकीत सर्वाधिक १ कोटी ४२ लाख मते मिळाली आहेत. तर दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरलेल्या शिवसेनेला ९० लाख मतं मिळाल्याचे त्यांनी सांगितले. हा फरक खूप मोठा आहे. १९९० नंतर १०० पेक्षा अधिक जागा मिळवणारा भाजप हा पहिला पक्ष ठरल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचा भाजपला टोला
तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील गुरुवारी राज्यात पुन्हा एकदा भाजपचंच सरकार येईल, असा दावा केला होता. भाजपशिवाय महाराष्ट्रात सरकार स्थापन करणे शक्य नाही. सर्व आमदारांना सत्तास्थापनेवेळी मुंबईत बोलावू, पण सध्या लोकांमध्ये जाऊन काम करा, असा सल्ला फडणवीस यांनी आमदारांना दिला होता.