निवडणुकीत पैसे वाटपावरून हाणामारी, शिवसेना उमेदवाराच्या पत्नीला तुरुंगवासाची शिक्षा

शिवसेना - मनसे कार्यकर्त्यांच्या हाणामारील पोलीस कर्मचारी विकास थोरबोले हे गंभीररित्या जखमी झाले होते

Updated: May 1, 2019, 11:08 AM IST
निवडणुकीत पैसे वाटपावरून हाणामारी, शिवसेना उमेदवाराच्या पत्नीला तुरुंगवासाची शिक्षा  title=

मुंबई : शिवसेना खासदार राहुल शेवाळे आणि आताचे दक्षिण मध्य मुंबईचे शिवसेना उमेदवार यांच्या पत्नी कामिनी शेवाळे आणि १७ जणांना मुंबई उच्च न्यायालयानं एक वर्षांची शिक्षा सुनावली आहे. २०१४ च्या निवडणुकीदरम्यान एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत पैसे वाटपावरून मारामारी झाली होती. त्यात एक पोलीस कर्मचारी विकास थोरबोले हे गंभीररित्या जखमी झाले होते.

२०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत तुर्भे इथं शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांत पैसे वाटपावरून राडा झाला होता. यावेळी मध्ये पडलेल्या विकास थोरबोले हे ड्युटीवर तैनात पोलीस कर्मचारी जखमी झाले होते. या प्रकरणात कामिनी शेवाळे यांच्यासह १७ जणांविरोधात खटला दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी या प्रकरणात कामिनी यांच्यासह अन्य १७ जणांवर आयपीसी कलम १४९ आणि ४२७ या कलमांखाली मारहाण, हत्येचा प्रयत्न आणि जमावबंदीचा गुन्हा दाखल केला होता. 


राहुल शेवाळे आणि कामिनी शेवाळे

मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली... न्यायाधीश डी के गुदाधे यांनी या सर्व आरोपींची हत्येचा प्रयत्न या आरोपातून सुटका केली. मात्र इतर गुन्ह्यांसाठी कामिनी शेवाळे यांच्यासह इतर १७ आरोपींना एका वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. न्यायालयानं तुर्तास कामिनी शेवाळे यांना जामीन मंजूर केला आहे. 

दरम्यान, या निर्णयाविरोधात वरच्या न्यायालयात दाद मागणार असल्याचं राहुल शेवाळे यांनी म्हटलंय.