मला राजकारणातून निवृत्त होऊ द्या- मनोहर जोशी

एका ठराविक वयानंतर आपण माणूस म्हणून शारीरिकरित्या कोसळतो.

Updated: Dec 2, 2018, 08:33 PM IST
मला राजकारणातून निवृत्त होऊ द्या- मनोहर जोशी title=

मुंबई: शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी राजकारणातून निवृत्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ते रविवारी दादर येथील कार्यक्रमात बोलत होते. मनोहर जोशींच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आज त्यांच्या 'प्रशासन' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या सोहळ्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी मनोहर जोशी यांनी उद्धव ठाकरे यांच्यासमक्ष मला राजकारणातून निवृत्त होऊ द्या, अशी मागणी केली. एका ठराविक वयानंतर आपण माणूस म्हणून शारीरिकरित्या कोसळतो. अशावेळी आपल्या मागे असलेल्या लोकांना रोखून धरणे योग्य नसल्याचे मत जोशी यांनी व्यक्त केले. 

यानंतर उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात जोशी यांच्या या मागणीवर भाष्य केले. सरांसारखी (मनोहर जोशी) व्यक्ती निवृत्त होऊ शकत नाही, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी सांगितले. 

मनोहर जोशी लिखित 'प्रशासन' या पुस्तकात वाचकांना त्यांच्या राजकीय कारकीर्दीतील अनुभव वाचायला मिळतील. ५२ वर्षांचा राजकीय आणि सामाजिक अनुभव, तसंच या काळात नगरसेवक, महापौर, आमदार, मुख्यमंत्री ते लोकसभा अध्यक्ष, अशी विविध पदं मनोहर जोशी यांनी भुषवली. त्यावेळी नोंदवलेल्या निरिक्षणांचा त्यांनी या पुस्तकात समावेश केला आहे.