प्रियंका चतुर्वेदी यांची शिवसेना उपनेतेपदी नियुक्ती

प्रियंका चतुर्वेदी यांना शिवसेेनेने मोठी जबाबदारी सोपविली.

ANI | Updated: Apr 27, 2019, 05:10 PM IST
प्रियंका चतुर्वेदी यांची शिवसेना उपनेतेपदी नियुक्ती title=

मुंबई : काँग्रेसला राम राम केलेल्या उत्तर प्रदेशमधील महत्वाच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी थेट मातोश्री गाठली आणि शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपविण्यात येईल, अशी माहिती प्रवेशाच्यावेळी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली होती. आज त्यांची शिवसेनेने उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 

प्रियंका चतुर्वेदी यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत असभ्य वर्तन केल्याच्या आरोपावरून निलंबित करण्यात आलेल्या आठ पदाधिकाऱ्यांना पुन्हा काँग्रेसमध्ये पुन्हा घेण्यात आले. त्यामुळे प्रियंका चतुर्वेदी या नाराज होत्या. टि्वटरवरुन त्यांनी आपली नाराजीही व्यक्त केली होती. आपण काँग्रेस पक्षासाठी घाम गाळला तसेच रक्त आटवले. मात्र काँग्रेसमध्ये किंमत नाही, गुंडांनामान मिळतो, अशा आशयाचे ट्वीट चतुर्वेदी यांनी केले होते.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी प्रियंका चतुर्वेदी यांना शिवबंधन बांधून पक्षप्रवेश दिला. त्यांच्या रूपाने आपल्याला चांगली बहीण मिळाली असून त्यांच्या बुद्धीचा देशाला आणि महाराष्ट्रास उपयोग होईल. त्यांच्यावर मोठी जबाबदारी देऊ, असे उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले होते.

मुंबई ही माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी असून लहानपणापासूनच आपल्याला शिवसेनेविषयी आत्मीयता आहे, असे प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या होत्या. महिलांच्या हक्कांसाठी आपल्याला माध्यमातून काम करावयाचे असून त्यासाठी शिवसेना हाच योग्य पक्ष आहे, अशा शब्दांत त्यांनी पक्षप्रवेशाच्या वेळी आपले मत मांडले होते.