शिवसेनेला मुख्यमंत्रीपद मिळणार की उपमुख्यमंत्रीपद?

युतीची घोषणा करताना विधानसभेत समान जागा, समान पद आणि समान जबाबदाऱ्या देणार असल्याचं भाजपकडून मान्य

Updated: Feb 19, 2019, 07:47 AM IST
शिवसेनेला मुख्यमंत्रीपद मिळणार की उपमुख्यमंत्रीपद? title=

मुंबई : युतीची घोषणा करताना विधानसभेत समान जागा, समान पद आणि समान जबाबदाऱ्या या जागावाटपाच्या सूत्रामुळे अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाचा शिवसेनेचा आग्रह मान्य झालाय की काय अशी चर्चा आहे. मात्र मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ अर्धा-अर्धा न करता शिवसेनेसाठी उपमुख्यमंत्रीपद दिलं जाऊ शकतं अशी माहिती सूत्रांकडून समजते आहे. शिवसेनेकडून गेल्या अनेक दिवसांपासून अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद असावं अशी मागणी केली जात होती. मात्र भाजप नेतृत्वानं ते वृत्त फेटाळलं. सूत्रांच्या माहितीनुसार युतीचं सरकार सत्तेवर आल्यास भाजपचा उमेदवार मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे. 

गेल्या साडेचार वर्षांपासून सत्तेत एकत्र असूनही विरोधकांप्रमाणे भांडणाऱ्या भाजप शिवसेनेनं अखेर सोमवारी आगामी निवडणुकीसाठी युतीची अधिकृत घोषणा केली. लोकसभेच्या २३ जागा शिवसेना लढवणार आहे तर भाजप २५ जागा लढवणार आहे. विधानसभेत मित्र पक्षांना जागा सोडल्यानंतर उरलेल्या जागा भाजप-शिवसेना समसमान लढवणार आहे. तसंच सत्ता आल्यानंतर समसमान मंत्रिपदाचं वाटप करण्यात येणार आहे. नाणार दुसरीकडे हलवण्याची मागणीही मुख्यमंत्र्यांनी मान्य केली आहे. त्यामुळे या युतीच्या व्यवहारात शिवसेनेनं बरंच काही पदरात पाडून घेतल्याचं चित्र आहे.

दुसरीकडे भाजपने ईडीची भीती घालून शिवसेनेला युती करण्यास भाग पाडल्याचा खळबळजनक आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. तर ही राफेल चोर आणि सत्तेसाठी लाचारांची युती असल्याचा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांनी लगावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनंही या युतीवर टीका केली आहे. कालपर्यंत चौकीदार चोर आहे असे म्हणणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आता युती केली.