Thackeray Group vs Shinde Group : मुंबईत आज दोन दसरा मेळावा होणार आहेत. थोड्याच वेळात शिवाजी पार्कवर ठाकरे गटाचा (Thackeray Group) तर आझाद मैदानात शिंदे गटाचा (Shinde Group) मेळावा होईल. दोन्ही गटाकडून जोरदार शक्तीप्रदर्शनाची तयारी सुरु आहे. यासाठी राज्यभरातील शिवसैनिक मुंबईत दाखल झाले आहेत. ग्रामीण भागातून शेकडोंच्या संख्येने एसटी बसमधून कार्यकर्ते मुंबईत आलेत. खासगी वाहनांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे.. मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागेवर या शिवसैनिकांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आलीय.. आम्ही साहेबांसोबत असा उल्लेख असलेली एकनाथ शिंदेंसोबतची पोस्टर्स या गाड्यांवर लावलेली आहेत. आमदार संजय गायकवाड यांच्या गाडीवरचा धर्मवीर आमदार हा पोस्टर मात्र सर्वांचं लक्ष वेधून घेत होता. (Shivsena Dussehra Melava)
आझाद मैदानात येणाऱ्या शिवसैनिकांसाठी शिंदे गटाकडून जेवणाची सोय करण्यात आलीय. सणाच्या दिवशी कोणीही उपाशी राहू नये यासाठी खबरदारी घेतली जातेय...यासाठी 50 हजार फूड पॅकेटेस तसंच एक लाख पाणी बॉटल्सची सोय करण्यात आलीय. तर शिवसेनेच्या ठाकरे गटाचा शिवाजी पार्कवर मेळावा होतोय.. या मेळाव्यात उद्धव ठाकरेंचे विचार ऐकण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक शिवाजी पार्कमध्ये दाखल झाले आहेत.
ठाकरे-शिंदेंसमोर आव्हान
ठाकरे आणि शिंदेंसमोरही दसरा मेळाव्यानिमित्त विविध आव्हानं समोर असतील. ठाकरे गट शिंदे गटाविरोधात न्यायालयीन लढाई लढतोय. तेव्हा आजच्या मेळाव्यानिमित्त जनतेच्या दरबारात न्याय मागण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे आपल्या भाषणातून करताना दिसतील. तसंच दुष्काळ, बेरोजगारी, आरक्षणावरुन सरकारवर तर हिंदुत्त्वाच्या मुद्यावर भाजपवर तोफ डागताना दिसतील. दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसाठीही हा दसरा मेळावा महत्त्वाचा आहे.. आरक्षण, नोकरभरती, जुनी पेन्शन योजना असे अनेक प्रश्न सरकारसमोर आहेत. तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजच्या भाषणात उद्धव ठाकरेंना लक्ष्य करतात की जनतेच्या प्रश्नांना संबोधित करतात याकडे सर्वांचं लक्ष असेल.
बाळासाहेबांची खुर्ची प्रमुख आकर्षण
शिवसेना शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची खुर्ची हे प्रमुख आकर्षण असणाराय. आझाद मैदानात होणाऱ्या मेळाव्यात बाळासाहेब ठाकरेंची ही खुर्ची स्टेजवर ठेवण्यात आलीय.. याच खुर्चीत बसून 2011 साली ठाण्यात बाळासाहेबांनी शेवटचं भाषण केलं होतं. त्याची आठवण जपण्यासाठी दसरा मेळाव्यात ही रिकामी खुर्ची ठेवण्यात आलीय.
आझाद मैदानात होणाऱ्या शिंदे गटाच्या मेळाव्यात विविध व्हिडिओंच्या माध्यमातून ठाकरे गटाची पोलखोल करण्यात येणार आहे. युती का तोडली, शिवसैनिकांना कशी वागणूक मिळत होती, संजय राऊत यांनी शिवसेना कशी तोडली आणि बीएमसी मधील घोटाळे याबाबतची पोलखोल करणारे व्हिडियो दाखवले जाणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिलीय..
तर शिवसेना खासदार संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना डिवचलंय. आझाद मैदानातल्या दसरा मेळाव्यानिमित्त मुंबईत शिंदे गटाने पोस्टरबाजी केलीय. यात एकनाथ शिंदेंच्या फोटोमागे बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावण्यात आलाय. एकनाथ शिंदेंच्या त्याच फोटोवरच्या पोझची नक्कल करत राऊतांनी शिंदेंना डिवचलंय. शिंदे गटाचा पुढचा दसरा मेळावा होणार नाही असा इशाराही राऊतांनी दिलाय.